हेल्मेट न वापरणाऱ्यांवर रडार वाहनाद्वारे कारवाई; रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ
अपघात टाळता येतात! अकलूजमध्ये रस्ता सुरक्षा अभियान, एसटी चालकांना मार्गदर्शन

रस्ता सुरक्षा अभियानाचा शुभारंभ; जानेवारीत अपघाती मृत्यू १५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट
अकलूज (केदार लोहकरे) —
अकलूज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियान १ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा शुभारंभ उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अकलूज व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आगार अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अमरसिंह गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली, एसटी आगार अकलूज येथे करण्यात आला.
या शुभारंभप्रसंगी एसटी आगारातील सर्व चालकांना सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांनी रस्ता सुरक्षा नियमांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अपघात ही निश्चितपणे टाळता येण्यासारखी गोष्ट असून वाहनचालकांनी सतर्कता व जबाबदारीने वाहन चालवावे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी आगामी वर्षात अकलूज एसटी आगार पूर्णपणे अपघातमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले.मोटार वाहन निरीक्षक सचिन झाडबुके यांनी चालकांना रस्त्यावर सतत लक्ष ठेवणे, पुरेशी झोप घेणे, वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणे व सुरक्षितरीत्या ओव्हरटेक करणे याबाबत मार्गदर्शन केले.
सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक शितल शिंदे यांनी उपस्थित सर्वांना रस्ता सुरक्षा शपथ दिली.कार्यक्रमास सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक राजेंद्र राऊत, वाहनचालक राजेंद्र जाधव, विक्रांत चव्हाण तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शुभारंभानंतर परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांनी घेतलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जानेवारी २०२६ मध्ये, जानेवारी २०२५ च्या तुलनेत रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या १५ टक्क्यांनी कमी करण्याचे उद्दिष्ट सर्व परिवहन कार्यालयांना दिले आहे.
हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जानेवारी २०२५ मध्ये अधिक अपघाती मृत्यू नोंद झालेल्या टेंभुर्णी, सांगोला व कुर्डूवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रस्ता सुरक्षा नियमांबाबत जनजागृती, मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई तसेच विविध रस्ता सुरक्षा उपाययोजना राबविण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनकुमार पोंदकुले यांनी दिली.
या मोहिमेसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे नव्याने दाखल झालेल्या रडार वाहनाच्या माध्यमातून विशेषतः हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी चालकांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.



