मनमिळावू नेतृत्वाचा अंत : राजेंद्र उर्फ बंडू वाळेकर यांचे हृदयविकाराने निधन
महाळुंगच्या सहकारी क्षेत्राचा आधारवड कोसळला – बंडू वाळेकर यांचे निधन

महाळुंग सेवा सोसायटीचे चेअरमन बंडू वाळेकर यांचे पुण्यात निधन
महाळुंग ता. माळशिरस येथील महाळुंग विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन राजेंद्र उर्फ बंडू वसंत वाळेकर वय 52 वर्ष यांचे आज सकाळी पुणे येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. तत्काळ त्यांना अकलूज मधील अश्विनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर करून पुणे येथे बायपास सर्जरी साठी सुप्रसिद्ध हृदय शस्त्रक्रिया करणारे डॉ.रणजीत जगताप यांच्या हॉस्पिटल मध्ये ॲडमिट करण्यात आले होते. ऑपरेशन पूर्वी प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपचारादरम्यान आयसीयू मध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
त्यांचे बंधू आणि परिसरातील सुप्रसिद्ध डॉक्टर संजय वाळेकर यांनी त्यांच्या निधनाची माहिती दिली. बंडू वाळेकर हे स्वर्गीय कुंडलिकभाऊ रेडे यांच्या राजकीय विचारांचे समर्थक आणि त्यांच्या स्थानिक पक्षाचे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जात होते.
बंडू वाळेकर हे सामाजिक, राजकीय आणि सहकारी क्षेत्रात सक्रिय होते. मनमिळावू स्वभाव, सर्वांशी जिव्हाळा, आणि गावातील प्रत्येक सुख-दुःखात सहभागी होणारे म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्या निधनाने परिसरातील लोकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. ते परिसरात भाऊसाहेब या नावाने देखील प्रसिद्ध होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, बंधू-भावजय, पुतणे असे कुटुंबीय आहेत.
परिसरातील सर्व समाजघटक, मित्रपरिवार, सहकारी आणि नागरिकांनी त्यांच्या आठवणी जागवून शोक व्यक्त केला आहे.
त्यांचा अंत्यविधी आज शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाळुंग रेडे वस्ती येथे होणार आहे.
त्यांच्या आत्म्यास शांती लाभो…
भावपूर्ण श्रद्धांजली.




