कॉपीमुक्त अभियानाला धक्का; माळीनगर केंद्रावर शिक्षण विभागाची धडक कारवाई
माळशिरसमध्ये बारावीच्या परीक्षेत कॉपीचा भंडाफोड; केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

सीसीटीव्हीतून उघड झाला कॉपीचा प्रकार; शिक्षणाधिकाऱ्यांची कडक कारवाई
रसायनशास्त्र पेपरदरम्यान ४-५ विद्यार्थ्यांकडे कॉपी साहित्य; प्रशासनाचा कठोर इशारा
सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. माळीनगर येथील दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय (केंद्र क्र. ४५४) येथे रसायनशास्त्र विषयाच्या पेपरदरम्यान काही विद्यार्थी कॉपी करत असल्याचे सीसीटीव्ही निरीक्षणातून स्पष्ट झाले.
बुधवार, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर सुरू होता. दुपारी सुमारे १२:१८ वाजता वर्ग क्रमांक १३ मधील काही विद्यार्थ्यांकडे संशयास्पद हालचाली दिसल्याने शिक्षण विभागाच्या नियंत्रण कक्षातून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य असल्याचे दिसून आले.
नियंत्रण कक्षातून तत्काळ केंद्र संचालक तथा प्राचार्य श्री. कल्लप्पा बाबूराव बिराजदार यांना दूरध्वनीद्वारे माहिती देण्यात आली. त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत ४ ते ५ विद्यार्थ्यांकडे कॉपीचे साहित्य आढळून आले. शासनाच्या ‘कॉपीमुक्त अभियान’ उपक्रमाला धक्का देणारी ही घटना अत्यंत गंभीर असल्याचे शिक्षण विभागाने नमूद केले आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सचिन जगताप यांनी गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, माळशिरस) यांना लेखी आदेश देत संबंधित केंद्र संचालकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच घटनेचा सविस्तर अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.
या कारवाईमुळे परीक्षा केंद्रांवरील शिस्त आणि पारदर्शकतेबाबत प्रशासन अधिक कठोर भूमिका घेणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कॉपी प्रकरणांवर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही नियंत्रण कक्षातून सातत्याने देखरेख ठेवली जात असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या घटनेमुळे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळात चर्चेला उधाण आले असून, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पालक व नागरिकांकडून होत आहे.



