महाळुंग परिसरातील शेतकरी संकटात | केळीच्या बागा कोलमडल्या | आंबा पिकालाही मोठा फटका
निसर्गाच्या रौद्ररूपाने शेतकरी हवालदिल; उभी पिके आडवी, शासनाकडे मदतीची आर्त हाक
महाळुंग-श्रीपूर परिसरात वादळी वाऱ्याचा उभ्या पिकांना मोठा फटका; केळीच्या बागा जमीनदोस्त, लाखो रुपयांचे नुकसान
इन महाराष्ट्र न्यूज, संपादक- दत्ता नाईकनवरे
श्रीपूर, ता. माळशिरस : शुक्रवारी सायंकाळी महाळुंग-श्रीपूर परिसरात आलेल्या जोरदार वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून उभी पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली आहेत. केळी, ऊस, मका तसेच आंबा पिकांना मोठा फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
सायंकाळी अचानक आलेल्या सुसाट वाऱ्यामुळे अनेक शेतांमधील केळीची बागा कोलमडून पडल्या. काही ठिकाणी केळीची झाडे निम्म्यातून मोडली तर अनेक झाडे मुळासकट उखडून पडली. विशेष म्हणजे काही बागा तोडणीसाठी अवघ्या आठ-दहा दिवसांवर आल्या होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या या रौद्ररूपाने हिरावून घेतला आहे.
महाळुंग परिसरातील शेतकरी मारुती रेडे यांच्या केळी बागेचे मोठे नुकसान झाले आहे. वाऱ्याच्या तडाख्याने मोठ्या प्रमाणात केळीची झाडे मोडून पडली असून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच किरण रेडे यांच्या आंबा बागेतील मोठ्या प्रमाणात कच्चे आंबे गळून पडल्याने त्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे. सौदागर शंकर रेडे यांच्या अडीच एकर केळीची बाग वादळाने पूर्ण जमीनदोस्त झाली आहे. त्यांचे आठ दिवसावर केळीचे घड तुटून मार्केटमध्ये जाणार होते.
केळीबरोबरच ऊस आणि मका पिकेही वाऱ्यामुळे आडवी झाली आहेत. अनेक शेतांमध्ये उभी पिके जमिनीवर लोळत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की रस्त्याच्या कडेला असलेली मोठमोठी झाडेही उन्मळून पडली. त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या नुकसानीमुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने विशेष आर्थिक मदत जाहीर करून मोठे मदत पॅकेज द्यावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
“वर्षभर कष्ट करून उभी केलेली पिके काही मिनिटांच्या वादळात उद्ध्वस्त झाली. शासनाने तातडीने मदत केली तरच शेतकरी पुन्हा उभा राहू शकेल,” अशा भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.आता सर्वांचे लक्ष महसूल आणि कृषी विभागाच्या पंचनाम्यांकडे लागले असून शासनाकडून मिळणाऱ्या मदतीची शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहेत. कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे.



