महाराष्ट्र

मुंडफणेवस्ती जि.प. शाळेला ब्रिमासागर कारखान्याकडून संगणक भेट

जिल्हा परिषद शाळेत आधुनिक शिक्षणाची सुरुवात; ब्रिमासागरकडून संगणक प्रदान

जि.प. शाळा मुंडफणेवस्तीला ब्रिमासागर कारखान्याची संगणक भेट

[श्रीपूर : संपादक दत्ता नाईकनवरे इन महाराष्ट्र न्यूज]
महाळुंग (मुंडफणेवस्ती), ता. माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळा मुंडफणेवस्ती येथे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी ब्रिमासागर महाराष्ट्र डिस्टलरीज लिमिटेड, श्रीपूर यांच्या वतीने संगणक भेट देण्यात आला. पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचे शिक्षण मिळावे, डिजिटल युगाशी पावले टाकता यावीत आणि त्यांच्या ज्ञानकक्षा विस्ताराव्यात, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

सदर संगणक कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया यांच्या हस्ते शाळेचे मुख्याध्यापक वाघ व शिक्षक मुलाणी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक तसेच महाळुंग–श्रीपूर नगरपंचायतीचे ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते नानासाहेब मुंडफणे, कारखान्याचे जनरल मॅनेजर दिनकर बेंबळकर, डेप्युटी मॅनेजर चंद्रकांत भागवत, जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मॅनेजिंग डायरेक्टर भरतकुमार सेठिया म्हणाले,
“आजचे युग विज्ञान व तंत्रज्ञानाचे आहे. संगणक हे केवळ एक यंत्र नसून ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन आहे. ग्रामीण व जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संगणक शिक्षणापासून वंचित राहू नयेत, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. लहान वयातच संगणकाचे प्राथमिक ज्ञान मिळाल्यास विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, विचारशक्ती विकसित होते आणि ते भविष्यातील स्पर्धात्मक जगासाठी सक्षम बनतात. संगणकामुळे अध्ययन अधिक रंजक, सुलभ व परिणामकारक होते. डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण होते, नवनवीन कौशल्ये आत्मसात होतात आणि त्यांची सर्वांगीण शैक्षणिक प्रगती घडते. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी कोणत्याही बाबतीत मागे राहू नयेत, त्यांना शहरातील विद्यार्थ्यांप्रमाणेच संधी मिळावी, या भावनेतून ब्रिमासागर कारखान्याच्या वतीने ही मदत देण्यात आली आहे. आजची मुले ही उद्याच्या देशाची खरी ताकद आहेत. त्यांना योग्य शिक्षण, साधने आणि प्रेरणा मिळाल्यास ते नक्कीच उज्ज्वल भविष्य घडवतील. पुढील काळातही शिक्षण, आरोग्य व सामाजिक विकासासाठी ब्रिमासागर कारखाना सदैव तत्पर राहील,” असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी नगरसेवक नानासाहेब मुंडफणे यांनी शाळेस संगणक भेट दिल्याबद्दल ब्रिमासागर कारखान्याचे आभार मानले. संगणक भेट मिळाल्याने शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पालक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!