त्रिमूर्ती केसरीसाठी दोन लाखांचे बक्षीस; शंकरनगर सज्ज
राष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा कुस्ती महाकुंभ शंकरनगरात

शंकरनगर येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती व वजन गट कुस्ती स्पर्धेचे आयोजन
अकलूज (केदार लोहकरे) शंकरनगर–अकलूज येथे सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवतीर्थ आखाडा, शंकरनगर–अकलूज येथे दिनांक १२, १३ व १४ जानेवारी २०२६ या कालावधीत अखिल भारतीय त्रिमूर्ती चषक कुस्ती स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जयंती समारंभ समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक व स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदर स्पर्धा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, प्रताप क्रीडा मंडळाच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होत आहेत.
यावेळी बोलताना सयाजीराजे मोहिते-पाटील म्हणाले की, “या स्पर्धेचे हे ४७ वे वर्ष असून महाराष्ट्रासह परराज्यातील राष्ट्रीय स्तरावरील मल्ल या स्पर्धेत सहभागी होतात. यंदा सुमारे ७५० पेक्षा अधिक मल्ल सहभाग नोंदवणार आहेत.”
त्रिमूर्ती केसरी खुल्या गट कुस्ती स्पर्धेसाठी
▪️ प्रथम क्रमांक – त्रिमूर्ती केसरी चषक व २ लाख रुपये
▪️ द्वितीय क्रमांक – १.५ लाख रुपये
▪️ तृतीय क्रमांक – १ लाख रुपये
▪️ चतुर्थ क्रमांक – ५० हजार रुपये
तसेच २५ ते ८५ किलो वजन गटांतील एकूण १५ गटांमध्ये विजेत्या व पराजित मल्लांसाठी आकर्षक बक्षिसांची योजना करण्यात आली आहे.
यावेळी वसंतराव जाधव यांनी सांगितले की, दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत मल्लांनी शिवतीर्थ आखाड्यात वजन नोंदणी करावी. त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजता उद्घाटन सोहळा समितीचे अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील व स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
तर दिनांक १४ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बक्षीस वितरण समारंभ राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व आमदार उत्तमराव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
या पत्रकार परिषदेला प्रताप क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष पोपटराव भोसले-पाटील, सचिव बिभीषण जाधव, अरविंद वाघमोडे, दादासाहेब कोकाटे, उमेश भिंगे, बाळासाहेब सावंत, रामचंद्र मिसाळ, सुहास थोरात, सतीश शेखर आदी मान्यवर उपस्थित होते.



