खडतर प्रवासातून उभा केलेला वैद्यकीय विश्वास; डॉ. उत्तम खरात यांना ‘निमरत्न’ पुरस्कार
रुग्णसेवेचा मानाचा तुरा – डॉ. उत्तम खरात यांचा निमा संघटनेकडून गौरव

संपादक दत्ता नाईकनवरे इन महाराष्ट्र न्यूज :
श्रीपूर (ता. माळशिरस) येथील साई हॉस्पिटलचे सर्वेसर्वा डॉ. उत्तम खरात यांना वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय, निरंतर व समाजाभिमुख कार्याबद्दल नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा) अकलूज शाखेतर्फे ‘निमरत्न’ या सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. हा पुरस्कार ८ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता शंकरनगर, अकलूज येथील मा. सहकारमहर्षी मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उदय सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
डॉ. उत्तम खरात यांनी अत्यंत गरीब व खडतर परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. श्रीपूर-महाळुंग तसेच पूर्व भागातील पंचक्रोशीमध्ये आरोग्य सेवेत सातत्याने सेवा देणारे आणि सर्वाधिक प्रॅक्टिस करणारे डॉक्टर म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. शांत स्वभाव, स्मित हास्य आणि रुग्णांचे अचूक निदान करण्याची त्यांची खास शैली यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास आहे.
श्रीपूर परिसरामध्ये सर्वप्रथम सुसज्ज असा दवाखाना उभारण्याचे श्रेयही डॉ. खरात यांनाच जाते. यापूर्वी त्यांनी शेती महामंडळ (कार्पोरेशन) येथे आरोग्य अधिकारी म्हणूनही सेवा बजावली आहे. सुरुवातीच्या काळात चौकात छोट्या दवाखान्यातून त्यांनी वैद्यकीय सेवा सुरू केली होती. आज त्यांच्या साई हॉस्पिटलमधून हजारो रुग्णांना आरोग्यसेवा मिळत आहे.
डॉ. खरात यांच्या या अखंड, समाजाभिमुख आरोग्य सेवेची दखल घेत निमा संघटनेने त्यांना ‘निमरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांच्या या गौरवाबद्दल श्रीपूर परिसरासह विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



