महाराष्ट्र

अकलूजमध्ये मायलेकीची कमाल! आई आणि मुलगी दोघीही एकाचवेळी दहावी पास

मुलगी ४११ गुणांनी पास, आईही दहावी उत्तीर्ण; अकलूजच्या मायलेकीची सोशल मीडियावर चर्चा

अकलूजमध्ये मायलेकीची जिद्दीची यशोगाथा

आई-मुलगी दोघीही एकाचवेळी दहावी उत्तीर्ण; अकलूज परिसरातून कौतुकाचा वर्षाव

अकलूज : शिक्षणासाठी वयाचे कोणतेही बंधन नसते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे अकलूज येथील मायलेकीने. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेत आई आणि मुलगी दोघींनीही एकाचवेळी यश संपादन करत परिसरात कौतुकाचा विषय ठरल्या आहेत.

अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेतील विद्यार्थिनी कु. लक्ष्मी नागनाथ क्षीरसागर हिने ५०० पैकी ४११ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले. विशेष म्हणजे तिची आई सौ. पूजा नागनाथ क्षीरसागर यांनीही वयाच्या ३७ व्या वर्षी बाह्य विद्यार्थिनी म्हणून दहावीची परीक्षा देत ५०० पैकी २१८ गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे.

आई आणि मुलगी दोघीही एकाचवेळी दहावी पास झाल्याने अकलूज परिसरात या मायलेकीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. शिक्षण अपूर्ण राहिल्यामुळे आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची जाणीव झाल्यानंतर सौ. पूजा क्षीरसागर यांनी पुन्हा शिक्षण घेण्याचा निर्धार केला. संसार, नोकरी आणि जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी अभ्यास करून हे यश मिळवले आहे.

सौ. पूजा क्षीरसागर या सध्या यशवंतनगर येथील सावित्रीबाई फुले लोकसंचलित साधन केंद्राच्या २१ चारी जयसिंहनगर येथे सीआरपी पदावर कार्यरत आहेत. घरची परिस्थिती सर्वसाधारण असतानाही आपल्या मुलीला उच्च शिक्षण देण्याचा त्यांनी ध्यास घेतला आहे. आपली मुलगी इंजिनिअर व्हावी, असे त्यांचे स्वप्न असून त्यासाठी त्या अहोरात्र मेहनत घेत आहेत.

लक्ष्मी हिनेही आईच्या संघर्षातून प्रेरणा घेत अभ्यासात सातत्य ठेवले. त्यामुळे आई-मुलीच्या या यशाची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. जिद्द, चिकाटी आणि शिक्षणाची ओढ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते, हे या मायलेकीने आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!