महाराष्ट्र

“भांडण मिटवू” म्हणत बोलावले अन् जीव घेतला; अकलूज पोलिसांत तिघांवर खुनाचा गुन्हा

संग्रामनगरात मारहाणीत युवकाचा मृत्यू; तिघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल

अकलूज : संग्रामनगर ता. माळशिरस येथील अशोक मुजमुले यांचा मारहाणीमध्ये गंभीर जखमी होऊन उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे व योगेश धाईंजे या तिघांविरोधात खुनासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी सौ. सावित्री अशोक मुजमुले या संग्रामनगर येथे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांचे पती अशोक मुजमुले हे वाहन चालक म्हणून काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. दिनांक ११ मे २०२६ रोजी सायंकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नरेंद्र खैरमोडे याच्यासोबत मुलींना बोलण्याच्या कारणावरून वाद झाला होता. तसेच नरेंद्र खैरमोडे याने शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे अशोक यांनी पत्नीला सांगितले होते.

यानंतर रात्री सुमारे साडेआठच्या दरम्यान “भांडण मिटवण्यासाठी बोलावले आहे” असे सांगून अशोक मुजमुले घराबाहेर गेले. रात्री सुमारे ९.४५ वाजण्याच्या सुमारास अशोक यांनी पत्नी सावित्री यांना फोन करून ट्रेंड मॉलजवळ औदुंबर नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे व योगेश धाईंजे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर सावित्री मुजमुले व त्यांची मुलगी अकलूज पोलीस ठाण्यात पोहोचल्या.

मारहाणीनंतर अशोक मुजमुले यांच्या अंगावरील शर्ट व बनियनवर रक्त लागलेले दिसून आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथे नेण्यात आले. त्यावेळी अशोक यांनी नरेंद्र खैरमोडे याने पत्नीशी संबंध असल्याचा संशय घेत मारहाण केल्याचे सांगितले. तसेच वैभव खैरमोडे याने डोक्यात दगड मारल्याचेही त्यांनी पत्नीला सांगितले होते.

दरम्यान, १२ मे रोजी पहाटे तीनच्या सुमारास अशोक मुजमुले यांना उलट्या होऊन प्रकृती गंभीर झाली. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी डोक्याला गंभीर मार लागल्याचे सांगत पुढील उपचारासाठी सोलापूर किंवा पुणे येथे हलवण्याचा सल्ला दिला. नातेवाईक त्यांना पुढील उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच प्रकृती अधिक खालावली. त्यानंतर पुन्हा अकलूज उपजिल्हा रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी सावित्री मुजमुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात नरेंद्र खैरमोडे, वैभव खैरमोडे व योगेश धाईंजे यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील खून, दुखापत, धमकी व संगनमताच्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अंकुश वाघमोडे करीत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!