शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींना छेडछाडीचा त्रास | पालकांमध्ये संताप, पोलिसांकडून कारवाईची मागणी
महाळुंग-श्रीपूर शाळा परिसरात रोड रोमिओंचा धुमाकूळ; विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

रोड रोमिओंच्या विळख्यात महाळुंग-श्रीपूर; निर्भया पथकाच्या गस्तीसाठी नागरिकांची मागणी
इन महाराष्ट्र न्यूज-संपादक : दत्ता नाईकनवरे :
श्रीपूर (ता. माळशिरस) श्रीपूर-महाळुंग परिसरातील जिल्हा परिषद शाळा, इंग्लिश स्कूल, हायस्कूल तसेच ज्युनिअर कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना सध्या रोड रोमिओ, मुलींच्या शेजारी राहणारे टवाळखोर आणि कायद्याला न जुमानणारे, पोलिसांना न भिणारे रोड रोमिओ, यांच्या वाढत्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शाळेत येताना आणि घरी परतताना अनेक मुलींना अवांछित शेरेबाजी, पाठलाग, रस्त्यात अडवणे , लैंगिक अत्याचाराचे कृत्य करणे तसेच मानसिक त्रास देण्याचे प्रकार वाढल्याची चर्चा पालकांमध्ये सुरू आहे.
मागील काही दिवसांत शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यांवर तसेच अकलूज बायपास परिसरातील ब्रिजखाली आणि रस्त्यावरून जाताना येताना काही निर्मनुष्य ठिकाणी विद्यार्थिनींना त्रास दिल्याच्या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र बदनामीची भीती, शिक्षणात अडथळा निर्माण होईल या चिंतेमुळे अनेक अल्पवयीन मुली अशा घटनांची तक्रार पालक किंवा शाळा प्रशासनाकडे करण्यास धजावत नसल्याचे दिसून येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते काही टवाळखोर तरुण दुचाकींवर फिरत शाळा सुरू होण्यापूर्वी, मधल्या सुट्टीत आणि शाळा सुटल्यानंतर परिसरात वारंवार फिरताना दिसतात. त्यामुळे विद्यार्थिनी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या मुलींना धाडसी बनवणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रकारचा त्रास सहन न करता तात्काळ शाळा प्रशासन, शिक्षक किंवा पालकांना माहिती द्यावी. शाळांमधील तक्रार पेटीचा वापर करूनही विद्यार्थिनी आपली तक्रार नोंदवू शकतात.
तसेच निर्भया पथक, पोलीस प्रशासन आणि शाळा व्यवस्थापन यांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून विद्यार्थिनींचे समुपदेशन करावे, शाळा परिसरात नियमित गस्त वाढवावी आणि अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, मायनरला जाताना निर्मनुष्य ठिकाणचा रोड आणि अकलूज बायपास रोडवरील ब्रिज खाली परिसरात घडलेल्या काही घटनांबाबत पोलीस प्रशासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती मिळत असून, यासंदर्भात अकलूज पोलिसांनी तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी अपेक्षा पालक आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
विद्यार्थिनींची सुरक्षितता ही केवळ कुटुंबाची नव्हे तर संपूर्ण समाजाची जबाबदारी आहे. शाळा परिसर भयमुक्त ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन, पालक, शिक्षक आणि नागरिकांनी एकत्रितपणे पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
“रोड रोमिओंच्या विळख्यात महाळुंग-श्रीपूर!”
“शाळकरी मुली असुरक्षित?”
“पालकांची पोलिसांकडे कारवाईची मागणी”
“निर्भया पथकाची गस्त वाढवणार?”



