ताहेरा फाउंडेशनचा सामाजिक उपक्रम | सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते पाणपोईचे उद्घाटन
उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा; ताहेरा फाउंडेशनची स्तुत्य कामगिरी

रमजान व शिवजयंतीचे औचित्य साधत अकलूजमध्ये ताहेरा फाउंडेशनची पाणपोई सुरू
अकलूजमध्ये सेवाभावाचा आदर्श: ताहेरा फाउंडेशनकडून पिण्याच्या पाण्याची सोय
अकलूज (प्रतिनिधी – केदार लोहकरे)
रमजान महिन्याच्या पवित्र पहिल्या रोजाच्या निमित्ताने तसेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीचे औचित्य साधून अकलूज येथे ताहेरा फाउंडेशनच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत पाणपोईचा उपक्रम सुरू करण्यात आला. अकलूज येथील जुन्या एसटी बस स्थानकाजवळ, सनराईज कलेक्शनच्या शेजारी सुरू करण्यात आलेल्या या पाणपोईचे उद्घाटन अकलूज नगरपरिषदेचे नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ताहेरा फाउंडेशनचे प्रतिनिधी इलाही बागवान यांनी फाउंडेशनतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. जुन्या एसटी स्टँड परिसरात पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. या भागात नेहमीच नागरिकांची मोठी वर्दळ असते. बाहेरगावाहून येणाऱ्या महिला, लहान मुले आणि प्रवाशांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने ताहेरा फाउंडेशनचे अध्यक्ष हाजी अबूबकरभाई तांबोळी तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी पाणपोई सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील यांनी ताहेरा फाउंडेशनने अकलूज परिसरात अनेक सामाजिक उपक्रम राबवून एक वेगळाच आदर्श निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार काढले. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सेवाभावी कार्य करणारी ही संघटना असल्याचे त्यांनी नमूद केले.
अकलूजच्या नगराध्यक्षा रेश्मा अडगळे यांनी पाणपोईच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त करत, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांसाठी हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे सांगितले. तसेच नूतन नगरसेवक क्रांतीसिंह माने-पाटील यांनीही सदर भागात पाणपोईची आवश्यकता होती, असे सांगत ताहेरा फाउंडेशनचे कौतुक केले.
कार्यक्रमास धर्मगुरू अलहाज हाफीज गणी मौलाना यांची प्रमुख उपस्थिती होती. परिसरातील शॉपिंग सेंटरमधील अनेक गाळेधारक व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाणपोईच्या उद्घाटनाबद्दल तसेच पिण्याच्या पाण्याची सोय झाल्याबद्दल गाळेधारक व नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी हाजी असलमभाई तांबोळी, जाकीर तांबोळी, मेंबर दादाभाई तांबोळी, हसन बागवान, शाहिद तांबोळी, शादाब तांबोळी यांनी हाजी अबूबकरभाई तांबोळी यांच्या समवेत परिश्रम घेतले.
एकंदरीत, रमजान आणि शिवजयंतीच्या पावन पर्वावर ताहेरा फाउंडेशनने राबविलेला हा उपक्रम सामाजिक एकात्मतेचा आणि सेवाभावाचा उत्तम संदेश देणारा ठरला आहे.
— संपादक : दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज



