महाराष्ट्र

महिला दिनानिमित्त विद्यार्थिनींना उद्योजकतेचे धडे

विद्यार्थिनींना व्यवसाय कौशल्यांची ओळख करून देणारी विशेष कार्यशाळा

अकलूज  (केदार लोहकरे):
अकलूज येथील श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील गृह विज्ञान महिला महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विद्यार्थिनींसाठी विशेष उद्योग विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. शिक्षणाबरोबरच व्यवसाय प्रशिक्षण मिळावे या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यशाळेसाठी इंदापूर येथील उदयोन्मुख फॅशन डिझायनर कु. सीबा मोमीन यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणातून फॅशन डिझाईन क्षेत्रातील संघर्षमय प्रवास विद्यार्थिनींसमोर उलगडून सांगितला. तसेच त्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक डिझाईन्सचेही विद्यार्थिनींसमोर प्रदर्शन केले. फॅशन क्षेत्रात नाव कमावलेल्या सीबा मोमीन यांनी विविध फॅशन शोचे आयोजन केले असून अनेक नामवंत कलाकारांसोबत काम केल्याचा अनुभव त्यांनी यावेळी सांगितला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, पारंपरिक शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या शोधात धडपड करण्यापेक्षा शिक्षण घेत असतानाच व्यावसायिक कौशल्ये आत्मसात करून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे आवश्यक आहे. गृहविज्ञान अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थिनींना उद्योग व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असून महाविद्यालय व शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेकडून त्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थिनी कु. प्रियंका सुरवसे या उदयोन्मुख मेकअप आर्टिस्टने सर्वसामान्य पद्धतीने मेकअप कसा करावा व त्यातून व्यवसाय कसा सुरू करता येतो याचे प्रत्यक्ष मॉडेलवर प्रात्यक्षिक सादर केले. या दोन्ही उद्योजिकांचे मार्गदर्शन विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरले.

कार्यक्रमात कु. अमृता मगरकु. वैष्णवी मोळे यांनी मनोगते व्यक्त केली, तर कु. संस्कृती माने हिने कविता सादर केली. कार्यक्रमाची प्रस्तावना सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. छाया भिसे यांनी केली. अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. अमित घाडगे यांनी विद्यार्थिनींना उद्योग व स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याचे मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम तृतीय वर्षाच्या रत्नाई ग्रुपने इव्हेंट मॅनेजमेंटच्या प्रात्यक्षिकांतर्गत आयोजित केला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. नेहा गायकवाडकु. सांस्कृती गांधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कु. किरण पवार हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थिनींचा मोठा सहभाग लाभला. महाविद्यालयाच्या विकास समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

संपादक : दत्ता नाईकनवरे

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!