महाराष्ट्र

अकलूज पोलिसांचा धडाका! तीन गुन्ह्यांचा छडा लावत आरोपींना ठोकल्या बेड्या

लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त; अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

बातमी क्रमांक १

एसटी स्टँडवर सोडण्याचे आमिष; प्रवाशाला निर्जनस्थळी नेऊन ९९ हजारांची जबरी चोरी

अकलूज : प्रतिनिधी

अकलूज शहरात प्रवाशाला मदतीचे आमिष दाखवून निर्जनस्थळी नेऊन तब्बल ९९ हजार ३५० रुपयांची जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा अकलूज पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली संपूर्ण रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.

जत तालुक्यातील वायफळ येथील फिर्यादी ३ जून रोजी अकलूज येथील एका हॉटेलमध्ये जेवण करून एसटी स्टँडकडे पायी निघाले होते. त्यावेळी दोन अनोळखी इसमांनी दुचाकीवरून येत एसटी स्टँडवर सोडण्याचे आमिष दाखवले. मात्र त्यांना स्टँडकडे न नेता तांबोळी वसाहत-गिरमेवस्ती परिसरातील निर्जनस्थळी नेण्यात आले. तेथे काठीने मारहाण करून त्यांच्या खिशातील ९९ हजार ३५० रुपये लुटण्यात आले.

या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. सुनिल भिमराव भिंगारदिवे (रा. राऊतनगर, अकलूज), आजिनाथ नागनाथ गिरी आणि संतोष महादेव गायकवाड (दोघे रा. सराटी, ता. इंदापूर) यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी आरोपींकडून चोरीची संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली असून या कामगिरीमुळे पोलिसांच्या तपास कौशल्याचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

बातमी क्रमांक २

बसमध्ये गर्दीचा फायदा घेत सोन्याची चैन लंपास; दोन सराईत चोरटे जेरबंद

अकलूज : प्रतिनिधी

अकलूज नवीन बसस्थानक परिसरात प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चैन चोरणाऱ्या दोन आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक करून ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत केला आहे.

अकलूज नवीन बसस्थानकातून टेंभुर्णीकडे जाणाऱ्या बसमध्ये प्रवासी चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यातील १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लंपास केली होती. याप्रकरणी अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान सुधीर रावसाहेब कराळे (रा. धामणगाव देवी, ता. पाथर्डी, जि. अहिल्यानगर) आणि शुभम गोरक्ष चव्हाण (रा. इंदिरानगर, पाथर्डी) यांच्यावर संशय बळावला.

दोन्ही आरोपींना अटक करून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून ९४ हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जप्त केली आहे.

प्रवाशांच्या गर्दीत घडणाऱ्या अशा गुन्ह्यांवर पोलिसांनी केलेली ही कारवाई नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करणारी ठरली आहे.

बातमी क्रमांक ३

पत्ता विचारण्याचा बहाणा; महिलेच्या गळ्यातील सोन्याचा पत्ता हिसकावणारे आरोपी अटकेत

अकलूज : प्रतिनिधी

माळखांबी परिसरात महिलेचा विश्वास संपादन करून गळ्यातील सोन्याचा पत्ता हिसकावून पळालेल्या दोन आरोपींना अकलूज पोलिसांनी अटक केली असून चोरीचा संपूर्ण मुद्देमाल आणि गुन्ह्यातील मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.

माळखांबी येथील फिर्यादी महिला शेतातून जनावरांसाठी चारा घेऊन जात असताना दोन अनोळखी इसमांनी त्यांना पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अडवले. बोलता बोलता आरोपींनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६ ग्रॅम वजनाचा सोन्याचा पत्ता हिसकावून पळ काढला.

घटनेनंतर दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण पथकाने हाती घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे बालाजी हणुमंत पवार (रा. पवारवस्ती, खेडभोसे, ता. पंढरपूर) आणि पंडित सुभाष होळकर (रा. व्होळे, ता. पंढरपूर) यांना अटक करण्यात आली.

आरोपींकडून चोरीस गेलेला सोन्याचा पत्ता तसेच गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे फिर्यादीला न्याय मिळाला असून पोलिसांच्या तत्पर तपासाबद्दल परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे.

पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक

या तिन्ही गुन्ह्यांचा अल्पावधीत छडा लावत चोरीस गेलेला जवळपास दोन लाख रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात अकलूज गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, अकलुज विभाग अकलुज संतोष वाळके, पोलीस निरीक्षक निरज उबाळे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम, पो. हवा. शिवकुमार मदभावी, विक्रम घाटगे, विनोद साठे, सुहास क्षिरसागर, राहुल रणनवरे, विशाल पोरे, पोलीस अंमलदार दत्तात्रय खरात, पंडीत गवळे, प्रविण काळे यांनी कामगिरी केली आहे. तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रविण मेटकरी, राहुल सोनकर यांचे सहकार्य केले आहे.  गुन्हे प्रकटीकरण पथकाने केलेली ही कारवाई नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!