महाराष्ट्र

काळजाला चिरणारी घटना | जन्मदात्याचाच जीवघेणा वार | कौटुंबिक वादातून मुलाचा खून | निमगाव (म) येथे खळबळ

लाकडी काठीच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

एका आईसमोर तिच्या मुलाचा मृतदेह आणि पती आरोपी

माळशिरस तालुक्यातील निमगाव (मगराचे) येथे बाप-लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून वडिलांनी स्वतःच्या मुलाला लाकडी काठीने बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि. ७ जून २०२६) सायंकाळी घडली. या घटनेमुळे निमगावसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत नितीन अंकुश राऊत (वय ४०, रा. निमगाव (म), ता. माळशिरस) हे काही वर्षांपासून सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे वास्तव्यास होते. अधूनमधून ते आपल्या गावी येत असत. रविवारी सायंकाळी ते निमगाव येथील घरी आले असता जुन्या कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात आणि वडील अंकुश राऊत यांच्यात वाद झाला.

वाद वाढत गेल्यानंतर त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी अंकुश राऊत यांनी लाकडी काठीने नितीन यांच्या डोक्यावर व शरीराच्या विविध भागांवर जोरदार प्रहार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. गंभीर मारहाणीत नितीन राऊत हे रक्तबंबाळ अवस्थेत घरातच कोसळले.

घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने नातेवाईकांना संपर्क साधत मदतीसाठी धाव घेतली. त्यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावण्यात आली. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर नितीन राऊत यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. एका आईसमोर तिच्या मुलाचा मृतदेह आणि पती आरोपी म्हणून उभा राहिल्याने गावकऱ्यांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

या प्रकरणी मृताची आई विमल अंकुश राऊत यांनी वेळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी अंकुश राऊत यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचा पुढील तपास वेळापूर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी आशिष कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. दरम्यान, आरोपी अंकुश राऊत यांना माळशिरस न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

निमगाव परिसरात या घटनेची दिवसभर चर्चा सुरू असून, कौटुंबिक वादाचे रूपांतर इतक्या टोकाला जाऊन एका तरुणाचा जीव जावा, ही बाब अत्यंत वेदनादायी असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

“वादाने घेतला जीव”

कौटुंबिक मतभेद आणि रागाच्या भरात घेतलेले निर्णय किती भयंकर ठरू शकतात, याचे उदाहरण निमगाव (म) येथील घटनेने पुन्हा एकदा समोर आले आहे. ज्या वडिलांनी मुलाला लहानाचे मोठे केले, त्याच वडिलांच्या हातून मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!