श्रीपूर परिसरात हळहळ | जुलाब-उलट्यांमुळे चिमुकलीचा मृत्यू
चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू

उष्णतेच्या लाटेत आणखी एक बळी; डीहायड्रेशनमुळे ९ वर्षीय मनांजली ताकतोडेचा मृत्यू
श्रीपूर येथे जुलाब-उलट्यांमुळे ९ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू ; परिसरात हळहळ
श्रीपूर ता. माळशिरस येथील मनांजली मंगेश ताकतोडे (वय ९) हिचा जुलाब व उलट्यांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे श्रीपूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सोशल मीडियावर भावपूर्ण श्रद्धांजलीचा वर्षाव होत आहे.
मनांजली ही श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक शाळेत चौथी इयत्तेत शिक्षण घेत होती. सध्या शाळांना उन्हाळ्याची सुट्टी सुरू असताना काल अचानक तिला जुलाब व उलट्यांचा त्रास सुरू झाला. सततच्या उलट्या-जुलाबामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण झपाट्याने कमी झाले व ती गंभीर अवस्थेत गेली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरू असतानाच आज सकाळी तिचा मृत्यू झाला.
मनांजली ही श्रीपूर येथील डिजिटल प्रिंटर व्यावसायिक मंगेश ताकतोडे यांची कन्या होती. तिच्या अकाली निधनामुळे ताकतोडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे.
दरम्यान, सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल होत असून परिसरात उष्णतेची लाट सुरू आहे. तीव्र उकाडा, दूषित पाणी तसेच अस्वच्छ अन्न यामुळे उलट्या-जुलाबाचे प्रमाण वाढत असल्याची माहिती वैद्यकीय तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. विशेषतः लहान मुले व वृद्ध व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हवामान विभागाकडून पुढील २४ तासांत काही ठिकाणी तीव्र उष्णतेची लाट व उष्ण रात्रींचा इशारा देण्यात आला आहे. ऊन आणि सावलीचा खेळ सुरू आहे, एप्रिल महिन्यापासूनच तापमानाचा पारा चढलेला असून उष्माघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून भरपूर पाणी पिणे, दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळणे, हलक्या रंगाचे सैल कपडे वापरणे तसेच लहान मुले व वृद्धांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे.



