सहकार महर्षींच्या जयंतीनिमित्त अकलूजमध्ये भव्य लेझीम महोत्सव । लेझीम स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ
अकलूजमध्ये २० व्या भव्य लेझीम स्पर्धेचा दिमाखदार शुभारंभ

अकलूज (केदार लोहकरे) अकलूज येथे संग्रामसिंह मोहिते-पाटील मित्र मंडळ व शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या २० व्या भव्य लेझीम स्पर्धेला मोठ्या उत्साहात व दिमाखात प्रारंभ झाला.

विजय चौक येथे स्पर्धेचे उद्घाटन मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील व अकलूजचे नूतन नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तर मैदान पूजन नगराध्यक्षा सौ. रेश्मा अडगळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या उद्घाटनप्रसंगी दिपकराव खराडे-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे व्हा. चेअरमन शंकरराव माने-देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव अभिजीत रणवरे, सहसचिव हर्षवर्धन खराडे-पाटील, समित्रा पतसंस्थेचे चेअरमन महादेवराव अंधारे, कारखान्याचे संचालक लक्ष्मण शिंदे, गोविंद पवार, रामचंद्र ठवरे, बाळासाहेब देशमुख, शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक सुभाष दळवी, नारायण फुले, वसंतराव जाधव, बाळासाहेब सणस, तसेच उत्कर्ष शेटे, निशा गिरमे यांच्यासह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, शाखा प्रमुख, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयोजकांच्या वतीने नूतन नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेवक सयाजीराजे मोहिते-पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, सलग वीस वर्षे लेझीम स्पर्धेचे आयोजन होणे हे अत्यंत अभिमानास्पद असून या स्पर्धेमुळे अनेक उत्कृष्ट खेळाडू घडले आहेत. खेळाडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती वाढीस लागली असून स्पर्धेस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविकात शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संजय राऊत सर म्हणाले की, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जयंतीनिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. ग्रामीण खेळ व कलेचे जतन-संवर्धन करणाऱ्या जयसिंह मोहिते-पाटील व मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत ७० हजारांहून अधिक लेझीम खेळाडू व प्रशिक्षक घडविण्यात आले असून, अकलूजच्या लेझीम खेळाची नोंद ग्रीनिज वर्ल्ड बुकमध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत प्राथमिक गटातील ५, मुलांचे ३१ व मुलींचे २२ असे एकूण ५८ संघ सहभागी झाले आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी व विशाल दळवी यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.



