पांडुरंग कारखाना व रोटरी क्लब,अकलूज संयुक्त विद्यमाने मोफत कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न
ऊस तोडणी महिला कामगारांसाठी पांडुरंग कारखान्यात कॅन्सर तपासणी शिबिर संपन्न

{श्रीपूर : दत्ता नाईकनवरे संपादक इन महाराष्ट्र न्यूज}
रोटरी क्लब अकलूज व कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना यांच्या संयुक्त विद्यमाने पांडुरंग कारखान्याच्या परिसरात ऊस तोडणी महिला कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोफत कॅन्सर तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिक व कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या शिबिराचे उद्घाटन पांडुरंग कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब अकलूजचे अध्यक्ष केतन बोरावके, सचिव अजिंक्य जाधव, प्रकल्प प्रमुख संदीप लोणकर, डॉ. अभिजीत मगर, अजित वीर, मनीष गायकवाड, अभिषेक टेके, ओजस दोबाडा, गजानन जंवजाळ, यबाजी सर आदी उपस्थित होते.
तसेच पांडुरंग कारखान्याचे कृषी अधिकारी संतोष कुमठेकर, चीफ अकाउंटंट रवींद्र काकडे, कृषी विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पोफळे, डॉ. प्रमोद पवार, भीमराव बाबर यांच्यासह कॅन्सर तपासणीसाठी कराड मेडिकल कॉलेज, सातारा येथील डॉ. आरुषी शर्मा, डॉ. नेहा पडवळ, डॉ. तनवी डांगे, सागर पवार, दिशा पारगे, सुषमा शेटे, शीतल पोळ, प्रिया कदम, माधुरी गायकवाड, गुंजन पाटील आदी डॉक्टर व परिचारिका उपस्थित होत्या.
या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली तोंडाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर व गर्भाशयाच्या कॅन्सरची प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणीबरोबरच कॅन्सरची लक्षणे, प्रतिबंधक उपाययोजना व वेळेवर निदानाचे महत्त्व याबाबत उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कारखान्याच्या सामाजिक बांधिलकीतून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचा लाभ कारखान्याचे कर्मचारी व ऊस तोडणी महिला कामगारांनी मोठ्या प्रमाणात घेतला. वेळेवर तपासणी केल्यास कॅन्सरवर यशस्वी उपचार शक्य असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले. अशा आरोग्यविषयक उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पांडुरंग सहकारी साखर कारखाना नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो, यावेळी ऊस तोडणी महिला कामगारांना साड्यांचे वाटप व लहान मुलांना खाऊ, स्वेटर्सचे वितरण करण्यात आले. भविष्यातही असे आरोग्य व सामाजिक उपक्रम राबविण्याचा संकल्प कारखाना व्यवस्थापनाने व्यक्त केला.



