शंकरनगर-अकलूज येथे ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान भव्य महाशिवरात्र यात्रा महोत्सव
कृषी प्रदर्शन, पीक व दुग्ध स्पर्धा, कुस्त्यांचा फड; शंकरनगर-अकलूजची महाशिवरात्र यात्रा सज्ज

महाशिवरात्री निमित्त शंकरनगर-अकलूज येथे सहा दिवसांचा धार्मिक व सांस्कृतिक महोत्सव
शंकरनगर-अकलूज येथे ११ ते १६ फेब्रुवारी दरम्यान भव्य महाशिवरात्र यात्रा महोत्सव
अकलूज प्रतिनिधी (केदार लोहकरे):
शंकरनगर-अकलूज येथील महाशिवरात्र यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सालाबादप्रमाणे यावर्षीही भव्य अशा महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून हा महोत्सव दि. ११ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. यात्रेच्या निमित्ताने कृषी व औद्योगिक प्रदर्शन, पीक प्रदर्शन व स्पर्धा, दुग्ध स्पर्धा, जनावरांचा बाजार तसेच जंगी कुस्त्यांचा फड अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
यात्रा व प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.०० वाजता अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते होणार असून, यावेळी कु. स्वरूपाराणी जयसिंह मोहिते-पाटील, संचालिका – स.म. शंकरराव मोहिते-पाटील स.सा.का.लि., शंकरनगर-अकलूज तसेच विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.०० वाजता पीक स्पर्धेमध्ये दाखल झालेल्या शेतीमालाच्या उत्कृष्ट नमुन्यांचे परीक्षकांकडून परीक्षण होऊन बक्षीसपात्र नमुन्यांची निवड केली जाणार आहे. त्याच दिवशी दुपारी ४.०० वाजता जातीवंत जनावरांची निवड करण्यात येणार आहे.
रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी पहाटे ५.३० वाजता महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त श्रीशिव-पार्वती अभिषेक व महापूजा विश्वतेजसिंह रणजितसिंह मोहिते-पाटील (अध्यक्ष – ग्रीनफिंगर्स आयुर्वेदिक हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर, शंकरनगर) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. शिवांशिका विश्वतेजसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
याच दिवशी सकाळी ६.३० ते ७.०० या वेळेत दुग्ध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, यात्रेमधील सर्व स्पर्धांचे बक्षीस वितरण सायंकाळी ५.०० वाजता यात्रा कार्यालयासमोर करण्यात येणार आहे.
सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.०० वाजता मल्लांच्या जंगी कुस्त्यांच्या फडाचे उद्घाटन विजयसिंह शंकरराव मोहिते-पाटील (माजी उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मदनसिंह शंकरराव मोहिते-पाटील (कार्याध्यक्ष) तसेच सयाजिराजे संग्रामसिंह मोहिते-पाटील (नगरसेवक, नगरपरिषद अकलूज) यांच्या शुभहस्ते होणार आहे.
या यात्रेमध्ये लहान मुलांसाठी खेळणी स्टॉल, विविध पाळणे, अल्पोपाहार व रसपानगृह स्टॉल उभारण्यात येणार असून यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची गर्दी अपेक्षित आहे. यात्राकाळात २४ तास पाणी व वीजपुरवठा, पर्यायी रस्ते, आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
याशिवाय रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८.०० वाजता यात्रा व पंचक्रोशीतील रसिक प्रेक्षकांसाठी प्रसिद्ध मंगला बनसोडे लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांनी या महाशिवरात्र यात्रा महोत्सवाचा व विविध प्रदर्शनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाशिवरात्र यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



