महाराष्ट्र

सांस्कृतिक कार्यक्रम व ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेने संग्रामनगरमध्ये महिला दिन साजरा

संग्रामनगरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात; महिला बचत गट मेळाव्यात ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेची रंगत

संग्रामनगर ग्रामपंचायत व आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्राच्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) – संग्रामनगर ग्रामपंचायत आणि आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) सोलापूर व महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) यांच्या सहकार्याने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भव्य महिला बचत गट मेळाव्यात ‘होम मिनिस्टर’ तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत पाहायला मिळाली.

या कार्यक्रमासाठी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका कु. स्वरुपाराणी जयसिंह मोहिते पाटील आणि अकलूज नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक सयाजीराजे संग्रामसिंह मोहिते पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून करण्यात आली.

यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. निशा गिरमे, संग्रामनगर ग्रामपंचायतीचे सरपंच अजित रेवंडे, उपसरपंच सुधीर रासकर, माजी सरपंच कमालभाई शेख, ग्रामसेवक कोरबू साहेब, सुरेश दामु पवार, सिद्धेश्वर मारुती पिसे, माविम जिल्हा कार्यालय सोलापूरचे निमंत्रित प्रतिनिधी व तालुका व्यवस्थापक रणजीत अंकुश शेंडे, तालुका उपजीविका सल्लागार उमेश जाधव तसेच ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

■ ‘खेळ पैठणीचा’ स्पर्धेचे आकर्षण

कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरलेल्या ‘खेळ पैठणीचा’ (होम मिनिस्टर) स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  • अंबिका योगेश गरड – प्रथम क्रमांक (पैठणी विजेती)
  • सुजाता सोमनाथ ननवरे – द्वितीय क्रमांक
  • वैशाली सुनील कोळेकर – तृतीय क्रमांक

याशिवाय इतर सहभागी महिलांनाही उत्तेजनार्थ आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.

■ महिला उद्योजकतेसाठी पुढाकार

यावेळी बोलताना नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी महिला सक्षमीकरणावर भर देत महिलांनी उद्योग-व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे आवाहन केले. महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत बचत गट भवन उभारण्यासाठी एक गुंठा जागेचे नियोजन करण्यात आले असल्याची घोषणा त्यांनी केली. तसेच महिलांना व्यवसाय उभारण्यासाठी ग्रामपंचायत सर्वतोपरी मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.

■ शासकीय योजनांचे मार्गदर्शन

माविमचे तालुका व्यवस्थापक रणजीत शेंडे यांनी महिलांना आर्थिक सक्षमीकरण, सत्ता, संपत्ती आणि समाजात मानाचे स्थान मिळवण्यासाठी ‘माविम’ आणि ‘उमेद’ अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. तर उपजीविका सल्लागार उमेश जाधव यांनी महिलांना विविध उपजीविका संधींबाबत मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आकांक्षा लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक, कर्मचारी, क्षेत्र समन्वयक तसेच सीआरपी (CRP) यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!