महाराष्ट्र

एआय तंत्रज्ञानावर ऊस शेती सुरू करणारा पांडुरंग जिल्ह्यातील पहिला साखर कारखाना

कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऊस उत्पादनात १५–२० टक्के वाढ शक्य – तज्ज्ञांचे मार्गदर्शन

इन महाराष्ट्र न्यूज, संपादक : दत्ता नाईकनवरे

श्रीपूर ता.माळशिरस येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या पुढाकारातून गेल्या सहा महिन्यांपासून काही शेतकऱ्यांनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस शेतीचा प्रयोग सुरू केला आहे. सोलापूर जिल्ह्यात एआय तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेती सुरू करणारा पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा पहिला कारखाना ठरत असून सध्या ८० शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. या तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात साधारण १५ ते २० टक्क्यांनी वाढ होत असून कमी खत, कमी पाणी आणि वेळेची बचत होत असल्याने शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होत असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून ऊस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत प्रास्ताविक करताना माहिती दिली. 

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ऊस पिकासाठी आवश्यक तेवढेच पाणी व रासायनिक खतांचा वापर करणे शक्य होत असून त्यामुळे उत्पादन खर्चात मोठी बचत होऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पादन मिळू शकते, असे मार्गदर्शन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ डॉ. समाधान सुरवसे यांनी केले.

कार्यशाळेचा शुभारंभ कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला. यावेळी डॉ. तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडोळ आदी तज्ज्ञ उपस्थित होते. डॉ. सुरवसे यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या मदतीने पिकांच्या वाढीच्या अवस्थेनुसार खत व पाण्याचे अचूक नियोजन करता येते. त्यामुळे पिकाला आवश्यक तेवढ्याच प्रमाणात खत आणि पाणी देणे शक्य होते. परिणामी मातीचे आरोग्य टिकून राहून उत्पादनाची गुणवत्ता वाढण्यास मदत होते.

तसेच एआय तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रोग व किडींबाबत आगाऊ सूचना मिळत असल्याने शेतकऱ्यांना योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाययोजना करता येतात. त्यामुळे पिकांचे नुकसान कमी होऊन उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. महाराष्ट्रात वाढत असलेल्या क्षारपड व चोपड जमिनीच्या पार्श्वभूमीवर हे आधुनिक तंत्रज्ञान जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि सुधारण्यासाठीही उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

पांडुरंग कारखान्याच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा ‘ऊस भूषण’ पुरस्कार यावर्षीपासून कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सर्वाधिक ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली. यावेळी तज्ज्ञ तुषार शितोळे, अजित वायसे, अरुण पडवळ, अविनाश पांगारकर व नितीन शिंदे यांनी शेतकऱ्यांना एआय आधारित ॲपचा वापर कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला शेतकी अधिकारी संतोष कुमठेकर, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, मुख्य लेखापाल रवींद्र काकडे, चीफ इंजिनीयर सचिन विभुते, महेश देशपांडे, समीर सय्यद, एस. ए. ताम्हाणे, आर. एस. पाटील, सोपान कदम, हनुमंत नागणे, भीमराव बाबर आदी अधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. सुधीर पोफळे यांनी मानले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!