टायपिंग परीक्षेत भक्ती कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची दैदिप्यमान कामगिरी; जिल्ह्यात व तालुक्यात मानाचा ठसा
जीसीसी-टीबीसी परीक्षेत अकलूजच्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी; अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळीचेही उल्लेखनीय यश

संपादक:- दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज
अकलूज (ता. माळशिरस) –येथील भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट ने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट मार्गदर्शनाची छाप उमटवत जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय जीसीसी-टीबीसी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत संस्थेच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवत अकलूजचे नाव जिल्हाभर उज्ज्वल केले आहे.
या परीक्षेमध्ये संस्थेतील कोमल प्रभाकर गोसावी हिने इंग्रजी ३० शब्द प्रति मिनिट स्पीड या विषयात तब्बल ९९ टक्के गुण मिळवत सोलापूर जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला असून माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या यशामुळे संस्थेच्या नावाला मोठी प्रतिष्ठा मिळाली आहे.
त्याचप्रमाणे मल्हार नितीन कुदळे याने इंग्रजी ३० स्पीडमध्ये ९८ टक्के गुण मिळवत तालुक्यात द्वितीय क्रमांक, तर निर्जरा रमेश माने हिने ९७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवत उत्कृष्ट यश मिळवले आहे. या तिघांनीही सातत्यपूर्ण सराव, मेहनत आणि संस्थेच्या मार्गदर्शनामुळे उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
या यशामध्ये सर्वाधिक प्रेरणादायी बाब म्हणजे पूर्णतः अंध असलेला विद्यार्थी जिब्रान जावेद तांबोळी. जिब्रानने इंग्रजी ३० स्पीडमध्ये ९५ टक्के आणि इंग्रजी ४० स्पीडमध्ये ८६ टक्के गुण मिळवत जिद्द, आत्मविश्वास आणि मेहनतीच्या जोरावर यशाचे नवे उदाहरण निर्माण केले आहे. परीक्षेदरम्यान त्याला वाचनकर्ता म्हणून प्रतीक होनमाने यांचे मोलाचे सहकार्य लाभले. जिब्रानच्या या यशाचे सर्व स्तरावरून विशेष कौतुक होत आहे.
विषयानुसार संस्थेतील प्रथम तीन क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे –
इंग्रजी ३० श.प्र.मि. : कोमल प्रभाकर गोसावी (९९%) प्रथम, मल्हार नितीन कुदळे (९८%) द्वितीय, निर्जरा रमेश माने (९७%) तृतीय.
मराठी ३० श.प्र.मि. : सौरभ लक्ष्मण कोळेकर (९६%) प्रथम, श्रद्धा उमेश गवसणे (९४.५%) द्वितीय, रणजीत रघुनाथ चव्हाण (९४%) तृतीय.
इंग्रजी ४० श.प्र.मि. : निर्जरा रमेश माने (९३.५%) प्रथम, सुशांत हरिदास वगैरे (९२.५%) द्वितीय, ज्ञानेश किशोर कटके (९२%) तृतीय.
याशिवाय ज्ञानेश किशोर कटके याने हिंदी ३० श.प्र.मि. विषयात ९५ टक्के गुण मिळवत विशेष यश संपादन केले. स्पीड विभागामध्ये आरती नलवडे, कोमल गोसावी, मल्हार कुदळे, स्नेहल चमरे, तेजश्री गमे व विठ्ठल देवकते यांनी ४० पैकी ४० गुण मिळवत उल्लेखनीय प्राविण्य मिळविले.
तसेच पत्रलेखन, तक्ता व ईमेल लेखन या विभागामध्ये ज्ञानेश कटके, प्रियंका होनमाने, विशाल खंडागळे, जिब्रान तांबोळी, अंकिता कदम, सौरभ कोळेकर, मल्हार कुदळे आणि प्रसाद शिंदे यांनी ३५ पैकी ३५ गुण मिळवत उत्कृष्ट प्राविण्य मिळविले. तर वस्तुनिष्ठ प्रश्न विभागात कोमल गोसावी व हिंदवी थिटे यांनी २५ पैकी २५ गुण मिळवत विशेष कौतुकास्पद कामगिरी केली.
या परीक्षेत संस्थेतील ७७ विद्यार्थ्यांनी ‘ए प्लस’ श्रेणी तर १९ विद्यार्थ्यांनी ‘ए’ श्रेणी मिळवत संस्थेच्या यशाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामागे संस्थेतील प्राचार्य गजानन जवंजाळ, तसेच नितीन दुरणे, किरण भगत, ज्ञानदीप जवंजाळ व प्रज्ञा गायकवाड यांचे परिश्रमपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे.
अकलूज परिसरात गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण, नियमित सराव, आधुनिक पद्धतीचे अध्यापन आणि विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष देणारी संस्था म्हणून भक्ती कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूटची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे दरवर्षी या संस्थेचे विद्यार्थी जीसीसी-टीबीसी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवत आहेत.
संस्थेचे प्राचार्य गजानन जवंजाळ यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विशेषतः अंध विद्यार्थी जिब्रान तांबोळी याच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत असून त्याचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



