विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांना एकाच ठिकाणी मिळाली सेवा; श्रीपूरात, शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्यासाठी श्रीपूरमध्ये समाधान शिबीर संपन्न

श्रीपूर येथे शासनाच्या समाधान शिबिरात ४१० दाखल्यांचे वितरण
श्रीपूर ता. माळशिरस येथील गणेश हॉलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतीमान करण्यासाठी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियान” अंतर्गत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या एकूण ४१० दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या समाधान शिबिराबाबत माहिती देताना माळशिरसचे नायब तहसीलदार अमोल कदम यांनी सांगितले की, “सध्या दहावी व बारावी परीक्षांचे निकाल लागले असून विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे विविध प्रकारचे दाखले, तसेच शेतकऱ्यांच्या प्रलंबित फेरफार नोंदी, डिजीटल ७/१२ उतारे, रहिवासी दाखले, जातीचे प्रमाणपत्र, तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन प्रकरणे, पाणंद रस्ते प्रशासकीय मान्यता आदी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामुळे विद्यार्थी, पालक तसेच शेतकरी वर्गाला विविध कार्यालयांचे हेलपाटे न मारता एका दिवसात आवश्यक दाखले मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.”
यावेळी त्यांनी शासनाने शेतकरी वर्गासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती देताना सांगितले की, पाणंद रस्ते, वनक्षेत्र वगळता १ जानेवारी २०११ पूर्वी शासनाच्या जागेवर वास्तव्यास असलेल्या नागरिकांची अतिक्रमणे नियमित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गायरान जमिनीवर राहणाऱ्यांची नावे नोंदवली जाणार असून संबंधित क्षेत्रावर ग्रामपंचायतीची नोंद करण्यात येणार आहे. अशा रहिवाशांनी त्वरीत आपल्या नोंदी करून घ्याव्यात, असे आवाहन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन निवासी नायब तहसीलदार अमोल कदम, मंडल अधिकारी शरद खंडागळे, पंचायत समिती सदस्य आप्पासो पाटील, मिरे गावचे माजी सरपंच विजयकुमार गुंड-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे संदीप सुरेश घाडगे, बोरगावच्या पोलीस पाटील मनीषा पाटील, दिलीप मिसाळ, विनायक केचे, विरेंद्र पाटील, नितीन घाडगे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाळुंगचे ग्राम महसूल अधिकारी निहाल जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन पत्रकार दत्ता नाईकनवरे यांनी केले. यावेळी महाळुंग मंडळातील महसूल अधिकारी सुदर्शन क्षीरसागर, राहुल जमदाडे, अजय टकले, श्वेता साखळकर यांच्यासह सर्व महसूल अधिकारी, कर्मचारी व परिसरातील महा-ई-सेवा चालक यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या समाधान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.



