महाराष्ट्र

श्रीपूर-महाळुंगमध्ये बकरी ईद उत्साहात साजरी | मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी

मुस्लिम बांधवांचे सामुदायिक नमाज पठण

बकरी ईद निमित्त श्रीपूर व महाळुंग मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांची गर्दी

बंधुभाव, त्याग आणि शांततेचा संदेश देत श्रीपूर-महाळुंगमध्ये बकरी ईद साजरी

श्रीपूर, ता. माळशिरस : श्रीपूर व महाळुंग परिसरात मुस्लिम बांधवांकडून बकरी ईद मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. श्रीपूर येथील मशिदीमध्ये आज सकाळपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी नव्या पोशाखात मशिदीत उपस्थित राहून सामुदायिक नमाज पठण केले. नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन देत “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देण्यात आल्या.

बकरी ईद अर्थात ईद-उल-अजहा हा मुस्लिम समाजातील अत्यंत महत्त्वाचा धार्मिक सण मानला जातो. त्याग, समर्पण आणि मानवतेचा संदेश देणारा हा सण असल्याने मुस्लिम समाजामध्ये विशेष धार्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. अल्लाहप्रती श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. समाजात बंधुभाव, प्रेम आणि एकोपा वाढावा हा संदेशही या सणातून दिला जातो.

श्रीपूर येथील मशिदीमध्ये सकाळी विशेष नमाज अदा करण्यात आली. यावेळी परिसरातील शेकडो मुस्लिम बांधव उपस्थित होते. नमाजानंतर समाजामध्ये शांतता, सद्भावना आणि देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. अनेकांनी एकमेकांच्या घरी भेटी देत सणाचा आनंद द्विगुणित केला.

महाळुंग येथे ईदगाह वरती सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. नमाजानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत सण साजरा केला. संपूर्ण परिसरात आनंदाचे आणि धार्मिक वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी स्थानिक नागरिकांनीही मुस्लिम बांधवांना बकरी ईदच्या शुभेच्छा देत सामाजिक ऐक्य आणि सौहार्द जपण्याचा संदेश दिला.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!