महाराष्ट्र

तीस वर्षांनी पुन्हा भरला वर्ग | श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

चेहरे ओळखीचे, पण नावे विसरलेली; तीस वर्षांनंतर मित्रांच्या भेटीने सर्व जण आनंदी 

शाळेची बेल, प्रार्थना आणि जुने बाक… 1996-97 बॅचच्या विद्यार्थ्यांनी जागवल्या आठवणी

ज्ञानमंदिरात पुन्हा एकदा दहावीचा वर्ग भरला; श्रीपूरच्या माजी विद्यार्थ्यांचा अनोखा मेळावा

[इन महाराष्ट्र न्यूज, संपादक-दत्ता नाईकनवरे 9421075931]

श्री चंद्रशेखर विद्यालय, श्रीपूर इयत्ता दहावी 1996-97 बॅच माजी विद्यार्थी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

श्रीपूर, ता. माळशिरस : आयुष्यातील अनेक वळणांवर माणूस कितीही पुढे गेला तरी शाळेतील दिवस, वर्गातील मित्र, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि बालपणीच्या आठवणी मनाच्या एका कोपऱ्यात कायम जपलेल्या असतात. अशाच आठवणींना उजाळा देत श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालयाच्या इयत्ता दहावी 1996-97 बॅचच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींचा स्नेहमेळावा रविवारी (दि. 31 मे 2026) अत्यंत आनंदी, उत्साही आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.

सुमारे तीस वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर एकमेकांशी संपर्क हरवलेल्या मित्र-मैत्रिणींना पुन्हा एकत्र आणण्याचे काम व्हॉट्सॲप च्या ग्रुपने केले. गेल्या काही वर्षे आणि महिन्यांपासून सुरू असलेल्या नियोजनातून हा मेळावा साकार झाला. सकाळी सर्व माजी विद्यार्थी श्रीपूर येथील आपल्या जुन्या शाळेच्या प्रांगणात जमा झाले. शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताना अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यांत जुन्या आठवणींना उजाळा देत  भावुक झाले होते.

विशेष म्हणजे कार्यक्रमाची सुरुवात अगदी पूर्वीच्या शालेय पद्धतीने करण्यात आली. शाळेची बेल वाजवण्यात आली आणि त्यानंतर सर्वांनी एकत्रित प्रार्थना केली. अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा प्रार्थनेचे स्वर शाळेच्या परिसरात घुमल्याने वातावरण भारावून गेले होते. त्यानंतर सर्वांनी ज्ञानमंदिरात प्रवेश करून संस्थापक कै. चंद्रशेखर आगाशे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यानंतर सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी 1996-97 मध्ये ज्या वर्गात शिक्षण घेतले होते त्या वर्गात प्रवेश केला. तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा त्याच वर्गात, त्याच बाकांवर बसण्याचा अनुभव प्रत्येकासाठी अविस्मरणीय ठरला. अनेकांनी आपली जुनी जागा शोधत बेंचवर स्थान घेतले. काही क्षणांसाठी जणू काळ तीस वर्षे मागे फिरल्याचा भास सर्वांना झाला.

ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणारे निरागस दिवस, डब्यातील भाकरी-चटणी वाटून खाणे, शिक्षकांची भीती, गृहपाठ न केल्यावर मिळालेली शिक्षा, सुट्टीच्या वेळी मैदानावर खेळलेले खेळ, भोंडला, वार्षिक स्नेहसंमेलनातील सहभाग, परीक्षेपूर्वीची धावपळ, पावसाळ्यात चिखलातून शाळेत जाण्याचे प्रसंग, शाळेच्या आवारातील वृक्षांच्या सावलीत मारलेल्या गप्पा अशा असंख्य आठवणींना या मेळाव्यात उजाळा मिळाला.

यावेळी तत्कालीन वर्गशिक्षक नागनाथ वाघमारे सर यांनी जुना कॅटलॉग आणून विद्यार्थ्यांची उपस्थिती घेतली. तब्बल तीस वर्षांनंतर पुन्हा एकदा हजेरीचा आवाज वर्गात ‘हजर सर’ ने घुमल्याने उपस्थितांच्या चेहऱ्यावर आनंद खुलला. अनेक जण एकमेकांना ओळखत होते, चेहरे परिचित वाटत होते; मात्र नाव आठवत नव्हते. नाव समजताच एकच हास्यकल्लोळ उसळत होता. काहींनी तर आपल्या मित्रांना तीन दशकांनंतर प्रथमच भेटल्याने भावनांना वाट मोकळी करून दिली.

या प्रसंगी माजी पर्यवेक्षक गंगाधर कुलकर्णी सर, माजी मुख्याध्यापक नागनाथ वाघमारे सर, माजी मुख्याध्यापक यशवंत मोहिते सर, माजी मुख्याध्यापक विनायक जोशी सर, माजी शिक्षिका अनुपमा पंडित मॅडम, पर्यवेक्षक नवनाथ आदटराव सर, शिरीष खोत सर तसेच सौ. मोहिते मॅडम यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल समाधान व्यक्त करताना शिक्षण, संस्कार आणि मैत्रीचे महत्त्व अधोरेखित केले.

त्यानंतर सर्वजण चिंचणी (ता. पंढरपूर) येथील ग्रामीण कृषी पर्यटन केंद्राकडे रवाना झाले. तेथे विविध पर्यटनस्थळांना भेट देण्यात आली. ग्रामीण जीवनशैली, कृषी संस्कृती आणि निसर्गरम्य वातावरणाचा सर्वांनी आनंद घेतला. दुपारच्या स्नेहभोजनानंतर कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात प्रत्येकाने स्वतःची ओळख करून दिली. सध्या कोण कोणत्या क्षेत्रात कार्यरत आहे, आयुष्यातील चढ-उतार, यशस्वी वाटचाल आणि शालेय जीवनातील आठवणी यांची मनमोकळी देवाणघेवाण झाली.

जुन्या आठवणी, विनोदी किस्से, शाळेतील खोड्या, शिक्षकांच्या आठवणी आणि मित्रांच्या गप्पांमध्ये वेळ कसा गेला हे कोणालाच समजले नाही. अनेकांनी समूह छायाचित्रे, सेल्फी आणि रील्स तयार करून या संस्मरणीय क्षणांची कायमस्वरूपी नोंद केली.

या यशस्वी स्नेहमेळाव्यासाठी हनुमंत मोरे, राजू पवार, मिसकर, जांबुवंत खोत, राजेंद्र डांगे, तसेच इतर सर्व स्थानिक माजी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनामुळे तीस वर्षांनंतरची ही अविस्मरणीय भेट सर्वांच्या आयुष्यातील एक भावनिक आणि आनंददायी सोहळा ठरली.

“शाळा संपते, पण शाळेच्या आठवणी कधीच संपत नाहीत,” याचा प्रत्यय या स्नेहमेळाव्यात प्रत्येकाला आला. जुन्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करत आणि नव्या आठवणींची शिदोरी घेऊन सर्वजण पुढील मेळाव्याच्या आश्वासनासह निरोप घेताना पुन्हा एकदा भावूक झाले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!