महाराष्ट्र

वडील हॉटेल मध्ये कामगार, आई शेतमजूर; लेक झाली मुंबई पोलीस

गायत्री क्षीरसागरने जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर साकारले स्वप्न

जिद्द, चिकाटी व कष्टाच्या जोरावर गायत्री क्षीरसागरची मुंबई पोलीस दलात निवड

संग्रामनगर (प्रतिनिधी संजय लोहकरे): पंचवटी (अकलूज) येथील कु. गायत्री रत्नकांत क्षीरसागर (वय २१) हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर मुंबई शहर पोलीस दलात निवड मिळवून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. तिच्या या यशाबद्दल परिसरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

गायत्रीचे वडील रत्नकांत त्रिंबक क्षीरसागर हे एका हॉटेलमध्ये काम करतात, तर आई सौ. उमा क्षीरसागर या शेतमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन स्वबळावर उभे राहण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यांच्या कष्टांचे फळ आज गायत्रीच्या यशाच्या रूपाने मिळाले आहे.

क्षीरसागर कुटुंबात चार मुली व एक मुलगा असा परिवार आहे. एका मुलीचा विवाह झाला असून दुसरी मुलगी डीएमएलटीचे शिक्षण घेत आहे. तर जुळी भावंडे दहावीचे शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत गायत्रीने मिळविलेले यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

गायत्रीला समरजीत करिअर अकॅडमीचे आप्पासाहेब तोरणे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांनी तिला मैदानी चाचणी व पोलीस भरतीचे प्रशिक्षण दिले. तसेच मनोज गरगडे सर यांनी लेखी परीक्षेची तयारी करून घेतली. लहानपणापासून पोलीस अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या गायत्रीचे हे स्वप्न आज पूर्ण झाले असून भविष्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) होण्याचे तिचे ध्येय आहे.

गायत्रीचे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पंचवटी येथे झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण दि मॉडेल विविधांगी प्रशाला येथे पूर्ण झाले. त्यानंतर अकलूज येथील शंकरराव मोहिते महाविद्यालयात कला शाखेत शिक्षण घेत असतानाच तिने पोलीस भरतीची तयारी सुरू केली. महाविद्यालयाच्या प्रथम वर्षापासून घेतलेले प्रशिक्षण आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे तृतीय वर्षात असतानाच तिची मुंबई पोलीस दलात निवड झाली.

“मुलांवर आमच्यासारखी मजुरी करण्याची वेळ येऊ नये, यासाठी आम्ही त्यांना शिक्षण दिले. त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य घडवावे, हीच आमची अपेक्षा होती. आज गायत्रीने आमचे स्वप्न पूर्ण केले आहे.” – रत्नकांत त्रिंबक क्षीरसागर (वडील)

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!