रोटरी क्लब अकलूज | डॉ.मनिष गायकवाड अध्यक्षपदी | अभिषेक टेके सचिवपदी निवड
समाजोपयोगी उपक्रमांना गती देणार रोटरी क्लब अकलूजची नवी टीम

रोटरी क्लब अकलूजचे २०२६-२७ वर्षासाठी नवे संचालक मंडळ जाहीर
अकलूज, प्रतिनिधी (केदार लोहकरे) : अकलूज येथील रोटरी क्लबच्या २०२६-२७ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून अध्यक्षपदी रो. डॉ. मनिष गायकवाड यांची तर सचिवपदी रो. अभिषेक टेके यांची निवड करण्यात आली आहे. यासोबतच रोटरीच्या विविध सेवा व प्रशासकीय विभागांसाठी संचालक मंडळाचीही घोषणा करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीमध्ये सीए शशिल गांधी यांच्याकडे खजिनदारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच नवनाथ नागणे यांची उपाध्यक्ष व टीआरएफ संचालक, जयदीप बोरावके यांची सहसचिव व क्रीडा संचालक, बबनराव शेंडगे यांची क्लब प्रशासन संचालक, सीए नितीन कुदळे यांची सभासदत्व संचालक, माजी अध्यक्ष केतन बोरावके यांची सार्वजनिक प्रतिमा संचालक, कल्पेश पांढरे यांची अध्यक्ष नियुक्त, अजिंक्य जाधव यांची तरुण पिढी सेवा संचालक, स्वराज फडे यांची आंतरराष्ट्रीय सेवा संचालक, राजीव बनकर यांची सार्जंट-ॲट-आर्म्स, ओजस दोभाडा यांची साक्षरता व सांस्कृतिक संचालक, आएशा शेख यांची स्त्री सक्षमीकरण संचालक, डॉ. अभिजित मगर यांची सेवा प्रकल्प संचालक, ॲड. दीपक फडे यांची क्लब शिक्षण सूत्रधार संचालक तसेच वाय. एन. याबाजी यांची व्यावसायिक सेवा संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे.
याशिवाय रोटरी क्लबचे ज्येष्ठ सदस्य मकरंद जामदार, ॲड. प्रवीण कारंडे आणि आशिष गांधी हे सल्लागार समिती सदस्य म्हणून नवीन कार्यकारिणीला मार्गदर्शन करणार आहेत.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष डॉ. मनिष गायकवाड यांनी सांगितले की, नव्या संचालक मंडळाचा पदग्रहण सोहळा लवकरच आयोजित करण्यात येणार असून आगामी रोटरी वर्षात आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, साक्षरता, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे विविध सेवा प्रकल्प राबविण्यावर भर दिला जाणार आहे. समाजातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत रोटरीच्या सेवाकार्याचा लाभ पोहोचविण्यासाठी सर्व सदस्य एकजुटीने कार्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नवनियुक्त अध्यक्ष, सचिव आणि संचालक मंडळाला शुभेच्छा देताना गजानन जंवजाळ यांनी त्यांच्या भावी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच रोटरी क्लब अकलूजच्या माध्यमातून सामाजिक सेवेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सर्वांचे अभिनंदन केले व उपस्थितांचे आभार मानले.
रोटरी क्लब अकलूज ही संस्था सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी उपक्रमांद्वारे परिसरात सातत्याने कार्यरत असून नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली आगामी वर्षात अनेक लोकहिताचे प्रकल्प राबविले जाणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
– दत्ता नाईकनवरे
संपादक, इन महाराष्ट्र न्यूज



