तांदुळवाडी अपघातातील शौर्यगाथा; डॉ. बनसोडे यांनी घेतली जीवनदात्यांची भेट
मृत्यूशी झुंज देत सहा जणांना दिले जीवनदान; दोन वीरांच्या घरी कौतुकाचा वर्षाव

तांदुळवाडी दुर्घटनेतील दोन देवदूतांना डॉ. सुहास बनसोडे यांचा सलाम
दत्ता नाईकनवरे,संपादक-इन महाराष्ट्र न्यूज
तांदुळवाडी येथे घडलेल्या भीषण अपघातात स्वतःचा जीव धोक्यात घालून सहा जणांचे प्राण वाचवणारे इरफान मुजावर आणि तानाजी सुर्वे या दोन धाडसी युवकांची श्रीपूर येथील सामाजिक कार्यकर्ते व वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डॉ.सुहास बनसोडे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या शौर्याला सलाम केला.
डॉ.बनसोडे यांनी तांदुळवाडी येथे जाऊन अपघातस्थळाची पाहणी केली. तसेच इरफान मुजावर आणि तानाजी सुर्वे यांच्याकडून संपूर्ण घटनेची माहिती जाणून घेतली. अपघाताच्या वेळी क्षणाचाही विलंब न करता दोन्ही युवकांनी धाडस दाखवत विहिरीत उतरून जीवाच्या आकांताने मदतीसाठी हाक मारणाऱ्या लोकांना बाहेर काढले. त्यांच्या या धाडसी कृतीमुळे सहा जणांना नवजीवन मिळाले.
यावेळी बोलताना डॉ.सुहास बनसोडे म्हणाले, “रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आम्ही दररोज अनेक रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी संघर्ष करत असतो. मात्र काल तांदुळवाडीत या दोन युवकांनी प्रत्यक्ष मृत्यूच्या दारात जाऊन सहा जणांना सुरक्षित बाहेर काढले. हे काम अत्यंत धाडसाचे आणि प्रेरणादायी आहे. अशा व्यक्तींमुळेच समाजात माणुसकी जिवंत असल्याची जाणीव होते.”
त्यांनी दोन्ही युवकांच्या घरी जाऊन त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत समाजासाठी आदर्श ठरल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेची माहिती राज्यभर पसरल्यानंतर विविध सामाजिक संस्था, युवक संघटना, ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि अनेक मान्यवर इरफान मुजावर(8788036224) व तानाजी सुर्वे (9503228224)यांची भेट घेण्यासाठी तांदुळवाडी येथे येत आहेत. त्यांच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, अनेकांनी त्यांना “जीवनदाता” अशी उपाधी दिली आहे.
आजच्या काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दुसऱ्यांचे प्राण वाचवण्यासाठी धावून जाणारे लोक क्वचितच पाहायला मिळतात. इरफान मुजावर आणि तानाजी सुर्वे यांनी दाखविलेली तत्परता, धैर्य आणि मानवता ही तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या दोन्ही वीरांच्या कार्याला द डेली लाईफ आणि इन महाराष्ट्र न्यूज परिवाराचा मनापासून सलाम!
दत्ता नाईकनवरे,संपादक-इन महाराष्ट्र न्यूज-9421075931



