महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडीजवळ भीषण अपघात, 14 भाविकांचा पिकप विहिरीत पडला

दर्शनाची यात्रा ठरली अखेरची; रांजणी गावावर शोककळा, 8 जणांचा मृत्यू

संपादक, दत्ता नाईकनवरे इन महाराष्ट्र न्यूज

दर्शनाची यात्रा ठरली अखेरची; रांजणी गावावर शोककळा, 8 जणांचा मृत्यू

(X) ट्विटर वरती मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली आहे.

तांदूळवाडी (ता. माळशिरस) : श्रद्धा, भक्ती आणि आनंदाने सुरू झालेला प्रवास काही क्षणांतच मृत्यूच्या दरीत कोसळला. म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावातील भाविकांवर रविवारी दुपारी काळाने भीषण घाला घातला. माळशिरस तालुक्यातील तांदूळवाडी गावाजवळ भाविकांची पिकअप गाडी रस्त्यालगतच्या खोल विहिरीत कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली. या हृदयद्रावक अपघातात लहान मुले व महिलांसह आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून सहा जणांना जीवदान मिळाले आहे.

म्हसवड येथील श्री सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेले भाविक दर्शन घेऊन आनंदाने आपल्या गावी परतत होते. मंदिराच्या बाहेर सर्वांनी ग्रुप फोटो देखील काढला तो काहींच्या जीवनाच्या शेवटचा फोटो ठरला. देवदर्शनाचा प्रसाद आणि समाधान मनात घेऊन घरी निघालेल्या या कुटुंबांवर काही क्षणांतच दुर्दैव कोसळले. दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास तांदूळवाडी परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव पिकअप थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या विहिरीत कोसळली.

विहिरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही क्षणांतच आनंदाचे वातावरण आक्रोशात बदलले. मदतीसाठी होणाऱ्या हाका आणि विहिरीत सुरू असलेली जीव वाचविण्याची धडपड पाहून उपस्थितांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.

अपघाताचा मोठा आवाज ऐकताच तांदूळवाडी परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. कोणतीही पर्वा न करता अनेक युवक विहिरीत उतरले. जीवाच्या आकांताने सुरू झालेल्या बचावकार्यातून काही भाविकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर स्थानिक नागरिक, प्रशासन आणि बचाव पथकांच्या मदतीने वाहन व मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू झाले.

घटनास्थळी आढळलेली दृश्ये अत्यंत वेदनादायी होती. मृतांमध्ये लहान मुलांचा आणि महिलांचा समावेश असल्याने प्रत्येकाचे मन हेलावून गेले. एकाच गावातील अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून रांजणी गावात शोककळा पसरली आहे. अनेक घरांचे आधारवड हिरावले गेल्याने गावभर हंबरडा फोडणाऱ्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.

दरम्यान, ज्या विहिरीत हा अपघात झाला ती विहीर रस्त्याच्या अगदी लगत असल्याचे सांगितले जात आहे. स्थानिक पातळीवर या विहिरीभोवती संरक्षक भिंत उभारण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. विहिरीच्या मालकाने जिल्हा प्रशासन तसेच संबंधित बांधकाम विभागाकडे वारंवार निवेदने दिल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्यात दुर्लक्ष झाल्याने हा अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.

या दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासन, पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हळहळ व्यक्त करीत असून मृत भाविकांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

देवदर्शन करून सुखरूप घरी परतण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या भाविकांचा प्रवास मात्र कायमचा थांबला. सिद्धनाथाच्या दर्शनाचा प्रसाद घरापर्यंत पोहोचण्याआधीच अनेक कुटुंबांचा संसार उद्ध्वस्त झाला आणि रांजणी गावाच्या इतिहासात दुःखाची काळी नोंद झाली.

सिद्धेश्वर पोपट जाधव, सागर चौगुले ड्रायव्हर, पूजा अमोल सातोरे, अपूर्व अमोल सातोरे, आरव अमोल सातोरे, शशिकला पोपट जाधव, बालाजी बावचे, संदीप बावचे, ताई बावचे, पूजा बालाजी बावचे, अश्विनी संदीप बावचे, सार्थक संदीप बावचे, संस्कृती संदीप बावचे, गणेश बालाजी बावचे, बालाजी बावचे यांचा लहान मुलगा असे सर्वजण देवाला गेले होते.  यामधील आठ जणांचा मृत्यू झालेला आहे. बाकीच्यांना जीवदान मिळालेले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!