सीमेवर बंदूक, हातात पुस्तक; देशसेवा करतानाच पत्रकारितेतील पदवी मिळवणारे विक्रम नाईकनवरे
मराठी माध्यमातून पत्रकारितेची पदवी, लेह-लडाखमध्ये देशसेवा; विक्रम नाईकनवरे यांची प्रेरणादायी कामगिरी

लेह-लडाखच्या बर्फात देशरक्षण, तर नाशिकमधून पत्रकारितेची पदवी – पंढरपूरच्या विक्रम नाईकनवरे यांची दुहेरी यशोगाथा

पंढरपूर : दत्ता नाईकनवरे,संपादक -इन महाराष्ट्र न्यूज
पंढरपूर येथील रहिवासी तथा भारतीय सेनेत देशसेवा बजावणारे विक्रम राजाराम नाईकनवरे यांनी प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द, चिकाटी आणि सातत्य राखत पत्रकारितेतील पदवी प्रथम श्रेणीत संपादन करून एक आदर्श निर्माण केला आहे. विशेष म्हणजे, लेह-लडाखसारख्या बर्फाच्छादित आणि अतिदुर्गम भागात देशरक्षणाची जबाबदारी पार पाडत असतानाच त्यांनी हे शैक्षणिक यश मिळवले आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या ३१ व्या दीक्षांत समारंभात सुमारे १ लाख २४ हजार विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. या दीक्षांत सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. निर्मलजीत सिंह कलसी उपस्थित होते. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. संजीव सोनावणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला हजेरी लावली.
विक्रम नाईकनवरे यांनी मराठी माध्यमातून पत्रकारिता व माध्यमशास्त्राचे शिक्षण पूर्ण केले. देशसेवा करत असतानाही शिक्षणाची मशाल अखंडपणे तेवत ठेवत त्यांनी मेहनत, सातत्य आणि गुणवत्तेचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
भारतभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर लढणारा हा वीर जवान, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन “शिका, संघटित व्हा, संघर्ष करा” या मूलमंत्राचे काटेकोर पालन करताना दिसून येतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या जिव्हाळ्याने पेलणारा कुटुंबवत्सल कर्ता पुरुष आणि विद्यार्थी दशेपासूनच पत्रकारितेत स्वतःला झोकून देणारा हा झुंजार पत्रकार आज अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे.
लेह-लडाखच्या बर्फात उणे तापमानात देशरक्षण, डोळ्यांत जागरूकता, हृदयात कुटुंबासाठी माया आणि डोक्यात अभ्यासाचे धडे—हे सर्व एकाच वेळी साध्य करणे म्हणजे अष्टावधानी कामगिरीच म्हणावी लागेल. देशसेवा आणि शिक्षण यांचा असा सुंदर संगम क्वचितच पाहायला मिळतो.
पत्रकारिता पदवी संपादन केल्याबद्दल विक्रम नाईकनवरे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. त्यांनी भविष्यातही देशसेवा करत समाजप्रबोधन व पत्रकारितेच्या माध्यमातून सत्य, मूल्ये आणि लोकशाही बळकट करण्याचे कार्य सुरू ठेवावे, अशा शुभेच्छा सोशल मीडिया मधून आणि प्रत्यक्ष येऊन दिल्या जात आहेत.



