दहावीच्या परीक्षा केंद्रावर रोड रोमिओंचा धुडगूस; कर्कश दुचाकींमुळे विद्यार्थ्यांची परीक्षा धोक्यात
पोलिसांचा धाक नाही? परीक्षा केंद्राबाहेर उडाणटप्पू तरुणांचा गोंधळ
सायलेन्सर काढून शाळेभोवती फेऱ्या; परीक्षा केंद्र असलेल्या चंद्रशेखर विद्यालय परिसरात रोड रोमिओंचा उपद्रव
श्रीपूर (ता. माळशिरस) – दहावीच्या बोर्ड परीक्षेसाठी शांत वातावरणाची गरज असताना श्रीपूर येथील श्री चंद्रशेखर विद्यालय परीक्षा केंद्राबाहेर रोड रोमिओंच्या धुडगूसामुळे विद्यार्थ्यांना व पालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागल्याची गंभीर घटना शुक्रवारी सकाळी घडली.
सध्या या केंद्रावर इयत्ता दहावीची परीक्षा सुरू असून शुक्रवारी विज्ञानाचा पेपर होता. सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान काही उडाणटप्पू तरुणांनी दुचाकींवर तिघे-तिघे बसून गाड्यांच्या सायलेन्सरच्या पुंगळ्या काढून कर्कश आवाज करत शाळेभोवती वारंवार चकरा मारल्या. परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थी व विद्यार्थिनींवर छाप पाडण्यासाठी त्यांनी वाहतूक नियम मोडत बेकायदेशीर प्रकार केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
दुचाकींच्या कर्णकर्कश आवाजामुळे परीक्षेसाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित झाले. परिसरातील नागरिक, शिक्षक, विद्यार्थिनींना सोडण्यासाठी आलेले पालक तसेच प्रवाशांनाही या प्रकाराचा मोठा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे काही रोड रोमिओंनी शिक्षकांशी उलटसुलट बोलत उर्मटपणाही दाखवल्याची माहिती मिळाली आहे.
या सततच्या त्रासाला कंटाळून काही मुलींचे पालक तब्बल चार तास परीक्षा केंद्रावर थांबून आपल्या मुलींना परीक्षा संपल्यानंतरच घरी घेऊन गेले. परिसरात असे प्रकार नेहमीच घडत असल्याचे सांगत काही पालकांनी “या रोड रोमिओंना पोलिसांचा कसलाही धाक नाही” असा आरोप केला.
शाळा सुरू होण्यापूर्वी, सुटल्यानंतर तसेच परीक्षा सुरू होण्याच्या व संपण्याच्या वेळी काही उडाणटप्पू तरुण केस पिंजारी दुचाकींचे सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत शाळेभोवती फेऱ्या मारत असल्याचेही स्थानिकांनी सांगितले. यामध्ये काही अल्पवयीन मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, १८ मार्च रोजी दहावीचा शेवटचा पेपर असून त्या दिवशीही अशाच प्रकारचा त्रास होण्याची भीती पालकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे विद्यार्थिनी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर अकलूज पोलिसांनी परीक्षा केंद्र परिसरात कडक बंदोबस्त ठेवून अशा रोड रोमिओंवर तसेच त्यांच्या दुचाकींवर तातडीने ट्राफिक कारवाई करावी, अशी जोरदार मागणी पालक व शिक्षकांकडून करण्यात येत आहे.



