अकलूज पोलीस पुन्हा चर्चेत — वेगवान तपासातून मोठे यश
सीसीटीव्हीच्या आधारे चोर जेरबंद; इको कारसह आरोपी ताब्यात

अकलूज, दि. ०४ (प्रतिनिधी) — अकलूज पोलीस स्टेशन यांच्या सतर्क आणि वेगवान कारवाईमुळे वाहन चोरीचा गुन्हा अवघ्या २४ तासांत उघडकीस आला असून चोरीला गेलेली इको कार आणि आरोपी यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीपशिंग नरेंद्रशिंग राजपूत (वय ४६, व्यवसाय आचारी, रा. बागेचीवाडी, ता. माळशिरस) यांनी दिनांक ०१ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२.३० ते पहाटे ५.०० वाजण्याच्या सुमारास अकलूज येथील पाटीदार मंगल कार्यालय, बायपास रोड येथून त्यांच्या मालकीची इको कार (क्र. एमएच ४५/ए क्यू ८९७०) अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दिली होती.
या तक्रारीवरून अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २२१/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत अज्ञात आरोपीविरुद्ध दिनांक ०२ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत आरोपीचा माग काढला. अत्यंत जलद गतीने तपास करत केवळ २४ तासांच्या आत आरोपी आकाश रामभाऊ रोकडे (वय २७, रा. वाघोली, पुणे) याला चोरीच्या वाहनासह ताब्यात घेण्यात आले.
ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत पोलीस निरीक्षक निरज उबाळे, उपनिरीक्षक विशाल कदम यांच्यासह पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी, सुहास क्षीरसागर, विक्रम घाटगे, विनोद साठे, पंडित गवळे, बबलू गाडे तसेच सायबर सेलचे निक्स पवार यांनी मोलाचे योगदान दिले.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिवकुमार मदभावी हे करत आहेत.



