महाराष्ट्र

नातेपुतेजवळ कार अपघातात | कालव्याने गिळले कुटुंब | आई-वडिलांसह मुलीचा दुर्दैवी अंत

जावई बचावला, पण संपूर्ण कुटुंब गमावले; नीरा कालव्याजवळ भीषण दुर्घटना

कार कालव्यात कोसळली; ३ ठार

नातेपुतेजवळ भीषण अपघात

नातेपुते (ता. माळशिरस) : नातेपुते परिसरात घडलेल्या एका भीषण अपघाताने संपूर्ण भाग हादरून गेला आहे. नीरा उजव्या कालव्यात कार कोसळून आई-वडिलांसह तरुण विवाहित मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी पहाटे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याने गावकरी सुन्न झाले आहेत.

यात्रेनिमित्त मुंबईहून फोंडशिरस येथे आलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सुनील मोहन टेळेकर (वय ३६) हे आपल्या कुटुंबासह मुंबईहून गावी येत होते. पहाटे साडेचारच्या सुमारास नातेपुतेजवळील शेरे पुलाजवळ त्यांच्या (एमएच ४३ सीसी ०९५८) इर्टिगा भरधाव कार थेट नीरा उजव्या कालव्यात कोसळली.

या भीषण अपघातात सुनील यांचे सासरे हनुमंत लक्ष्मण जठार (५५), सासू मंजूळा हनुमंत जठार (४९) आणि पत्नी प्रीती सुनील टेळेकर (३०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. स्थानिक नागरिक व प्रशासनाच्या मदतीने हनुमंत व मंजूळा जठार यांचे मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आले. मात्र प्रीती टेळेकर यांचा मृतदेह अद्याप सापडला नसून तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. शोधमोहीम सुरू असून प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

या अपघातात सुनील टेळेकर सुदैवाने बचावले असले तरी ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, त्यांचा मुलगा दक्ष (११) हा मामाकडे असल्यामुळे या भीषण दुर्घटनेतून बचावला.

एकाच क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कालव्याच्या धोकादायक वळणांबाबत पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!