महाराष्ट्र

वादळी वारा आणि पावसाचा तडाखा | जांभूडमध्ये वादळी वाऱ्याने केळी, डाळिंब व मक्याचे मोठे नुकसान

तोडणीपूर्वीच केळीची बाग जमीनदोस्त; शेतकरी मदनसिंह पाटील यांचे 40 लाखांचे नुकसान

वादळी वाऱ्याने आणि मुसळधार पावसाने जांभूड परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

(संपादक दत्ता नाईकनवरे  इन महाराष्ट्र न्यूज) 

श्रीपूर, ता. माळशिरस : रविवारी रात्री झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे जांभूड परिसरातील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी केळी, डाळिंब आणि मक्याची पिके जमीनदोस्त झाली असून फळबागांचेही मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

जांभूड परिसरातील बोरगाव येथील रहिवाशी असणारे शेतकरी मदनसिंह पाटील यांच्या 11 एकर केळी बागेचे वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. अवघ्या २० दिवसांवर केळीची तोडणी येणार होती. बाजारपेठेत पाठविण्यासाठी बॉक्स पॅकचा मालही तयार झाला होता. सध्या बाजारात केळीला २२ ते २३ रुपये प्रतिकिलो दर मिळत असल्याने सुमारे २०० ते २५० टन केळी बाजारात विक्रीसाठी जाण्याची अपेक्षा होती. मात्र रविवारी रात्री आलेल्या वादळाने संपूर्ण बागेची नासधूस केली. अनेक केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली असून अनेक घड तुटून जमिनीवर कोसळले आहेत.

या नुकसानीबाबत माहिती देताना शेतकरी अजिंक्य मदनसिंह पाटील यांनी सांगितले की, “केळी लागवडीपासून ते तोडणीपर्यंत मोठ्या प्रमाणात खर्च केला होता. वर्षभर केलेली मेहनत एका रात्रीत वाया गेली आहे. आता उत्पादन तर मिळणार नाहीच, शिवाय खराब झालेली झाडे व पीक काढण्यासाठीही अतिरिक्त खर्च करावा लागणार आहे.”

रविवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास आलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने परिसरातील अनेक शेतांमध्ये हाहाकार माजवला. केळीच्या बागांबरोबरच डाळिंब व मक्याच्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी झाली असून शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

सध्या नुकसानग्रस्त शेतकरी शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. महसूल व कृषी विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी जांभूड परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या या मोठ्या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून वर्षभराच्या कष्टाचे पीक डोळ्यादेखत उद्ध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!