प्रदूषणमुक्त भविष्यासाठी सायकल संस्कृतीची गरज : हेमंत बरडे
महाळुंग-श्रीपूर येथील विद्यार्थ्यांचा स्लो सायकलिंगमध्ये उत्स्फूर्त सहभाग

सायकल दिनानिमित्त एन.डी. स्कूलमध्ये स्लो सायकलिंग स्पर्धा उत्साहात संपन्न
संपादक : दत्ता नाईकनवरे-इन महाराष्ट्र न्यूज
श्रीपूर : जागतिक सायकल दिनानिमित्त मेरा युवा भारत, सोलापूर आणि न्यू डायमंड इंग्लिश मीडियम स्कूल, महाळुंग-श्रीपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्लो सायकलिंग स्पर्धेचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, आरोग्य संवर्धन आणि सायकल वापराबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संस्थेचे संस्थापक हेमंत बरडे यांनी प्रास्ताविकात सायकलचे महत्त्व विशद केले. सायकल हे प्रदूषणमुक्त आणि आरोग्यदायी वाहन असून नियमित सायकल चालवल्यामुळे शरीराचा उत्तम व्यायाम होतो. वाढत्या वाहनसंख्येमुळे वायुप्रदूषण आणि पर्यावरणीय असंतुलन निर्माण होत आहे. त्याचा परिणाम म्हणून जागतिक तापमानवाढ आणि उष्णतेची तीव्रता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरण संवर्धनासाठी आणि निरोगी जीवनशैलीसाठी शक्य तितका सायकलचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बलभीम चव्हाण, जीवन मोहित आणि लोखंडे काका उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. स्लो सायकलिंग ही एकाग्रता, संतुलन आणि संयम यांची कसोटी पाहणारी स्पर्धा असल्याने सहभागी विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण प्रदर्शन केले.
या स्पर्धेत एकूण ५५ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत आयान डांगे याने प्रथम क्रमांक पटकावला. सुरज मिसाळ याने द्वितीय तर समर्थ घालमे याने तृतीय क्रमांक मिळविला. विजेत्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्कूलचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बस चालक तसेच शाळेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जाणीव निर्माण करून सायकल वापराला प्रोत्साहन देणारा हा उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला. स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.



