महाराष्ट्र

श्रीपूर मध्ये 15 तारखेला मिळणार एका ठिकाणी सर्व दाखले व महसुली सुविधा

छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे श्रीपूर येथे आयोजन

महसूल विभागाच्या वतीने महाळुंग मंडळासाठी विशेष महसूल समाधान शिबिर

श्री गणेश हॉल येथे १५ मे रोजी १५ पेक्षा जास्त महसुली सेवा उपलब्ध

(संपादक: दत्ता नाईकनवरे, इन महाराष्ट्र न्यूज)
श्रीपूर तालुका माळशिरस : श्री गणेश हॉल श्रीपूर येथे शुक्रवार दिनांक 15 मे 2026 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत महसूल विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” आयोजित करण्यात आले असून, महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावर ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांच्या महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. पैकी…

महाळुंग मंडळातील सर्व गावे – महाळुंग-श्रीपूर, मिरे, उंबरे, कोंडारपट्टा, नेवरे, जांभुड, विठ्ठलवाडी, खळवे, माळखांबी, बोरगाव, माळेवाडी (बो.) या गावांसाठी एकत्रित  महाळुंग मंडल मधील श्रीपूर गणेश हॉल येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

कार्तिकेन एस (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी सोलापूर,यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीमती विजया पांगारकर, उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज, सुरेश शेजुळ तहसीलदार माळशिरस, रविकांत शेटे पुरवठा अधिकारी माळशिरस, महाळुंग मंडल अधिकारी, सर्व ग्राम महसूल अधिकारी व महसूल सेवक यांच्या उपस्थितीत हे शिबिर पार पडणार आहे.

शिबिर स्थळी १५ पेक्षा जास्त महसुली सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामध्ये, प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२ आणि ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक (NA) तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, अँग्रिस्टॅक आणि पी. एम. किसान नोंदणी, भूमापन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पक्के तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार आहेत. तसेच कागदपत्रे पूर्ण असणाऱ्या रेशन कार्ड संबंधी-नवीन रेशन कार्ड,  कार्ड मधून नाव कमी करणे किंवा वाढविणे,  सर्व कागदपत्रे परिपूर्ण असतील त्यांचे रेशन कार्ड संदर्भातील प्रस्ताव जमा करून घेतले जातील.

“हे शिबिर शुक्रवार दि. १५ मे २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत श्री गणेश हॉल, श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथे आयोजित करण्यात आले आहे. आज पासूनच संबंधित लाभधारकांनी आवश्यक आपली सर्व प्राथमिक कागदपत्रे तयार करून संबंधित महा-ई-सेवा केंद्रात किंवा ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करावीत, तसेच शिबिरामध्ये येऊन सुविधांचा लाभ घ्यावा.” अशी माहिती शरद खंडागळे, मंडल अधिकारी महाळुंग यांनी दिली.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!